जखणगावच्या हनीट्रॅपमध्ये आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:04+5:302021-05-21T04:22:04+5:30
अहमदनगर : नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरणामध्ये गुरुवारी पोलिसांनी हिंगणगाव येथील बापू बन्सी सोनवणे यास अटक केली. त्याच्याकडून आलिशान गाडीही ...
अहमदनगर : नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरणामध्ये गुरुवारी पोलिसांनी हिंगणगाव येथील बापू बन्सी सोनवणे यास अटक केली. त्याच्याकडून आलिशान गाडीही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील महिलेसह दोघांची पोलीस कोठडी २४ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका ३० वर्षीय महिलेने एका व्यावसायिकाला शरीरसंबंधाचे आमिष दाखवून व त्याचा अश्लील व्हिडिओ बनवून त्याच्याकडून १ कोटीची खंडणी मागितली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिच्यासह तिचा साथीदार अमोल मोरे यास अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात या महिलेने अनेकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले असल्याचे समोर आले. त्यानंतर एका क्लासवन अधिकाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकून खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल असून त्यात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी हिंगणगाव येथून बापू बन्सी सोनवणे यास अटक केली. त्यासोबत त्याची फाॅर्च्युनर गाडीही जप्त करण्यात आली आहे. सोनवणे हा व्यावसायिक असून संबंधित महिलेला तो या कामात मदत करत असे. त्याच्याकडून पोलिसांना याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिला व तिचा साथीदार मोरे यांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत दोघांची पोलीस कोठडी वाढवली.