पाथर्डी तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 03:53 PM2020-11-20T15:53:50+5:302020-11-20T15:54:52+5:30
पाथर्डी तालुक्यात दोन महिन्यापासून नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात त्रस्त झाले असताना शिरसाटवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आणखी एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला आहे.
पाथर्डी : तालुक्यात दोन महिन्यापासून नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात त्रस्त झाले असताना शिरसाटवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आणखी एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याकडून झालेल्या हल्ल्यात तीन लहान बालकांची शिकार झाली आहे. याच बिबट्याकडून अनेक पाळीव प्राण्यांची देखील शिकार झालेली आहे. तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगा परिसरातील नागरिकात प्रचंड दहशत पसरली आहे. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे राज्यभरातून नेमबाजांना पाचारण करण्यात आले होते. परंतु दिवसा दडी मारून बसलेला बिबट्या रात्री चोरपावलांनी शिकार करत असल्याने त्याच पकडणे जिकिरीचे झाले होते. वनविभागातर्फे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आतापर्यंत तीन बिबटे पकडण्यात आले असून अजूनही तालुक्यात बिबट्याकडून मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे. पाथर्डी शहराच्या जवळच असलेल्या शिरसाटवाडी तलाव परिसरात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या अडकला. ही माहिती समजल्यानंतर परिसरात नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. पकडलेला बिबट्या सुरुवातीला पाथर्डी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आला. नंतर तो पुढील वैद्यकीय तपासणीसाठी नगर येथील वनविभागाच्या कार्यालयात पाठविण्यात आला आहे. |