‘अगस्ती’चे कर्ज कसे फेडणार याचे उत्तर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:14+5:302021-02-09T04:23:14+5:30
अकोले : अगस्ती साखर कारखान्याच्या कारभाराची चौकशी लागणार आहे. झारीतले शुक्राचार्य बाजूला होणार हे ऊस उत्पादक सभासदांच्या एकीतून निश्चित ...
अकोले : अगस्ती साखर कारखान्याच्या कारभाराची चौकशी लागणार आहे. झारीतले शुक्राचार्य बाजूला होणार हे ऊस उत्पादक सभासदांच्या एकीतून निश्चित घडेल. अगस्तीच्या सत्ताधाऱ्यांनी हिम्मत असेल तर ३५० कोटी कर्ज कसे फेडणार? याचे उत्तर सभासदांना समोरासमोर येऊन द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
२७ फेब्रुवारीला अगस्ती कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेला सभासदांनी उपस्थित राहावे याचे आवाहन करण्यासाठी इंदोरी येथे विठ्ठल मंदिर सभागृहात सोमवारी सहविचार सभा झाली. याप्रसंगी आमदार लहामटे बोलत होते. यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत, कारभारी उगले, बी. जे. देशमुख, विनय सावंत, भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, मारुती मेंगाळ, बबन नवले, केशव नवले, पांडुरंग नवले, विनोद हांडे, लक्ष्मण नवले, दिलीप नवले, विठ्ठल नवले, कैलास देशमुख, संतोष नवले, निखिल नवले, सुभाष येवले उपस्थित होते.
चंगळवादामुळे साखर कारखाना कर्जाच्या खाईत गेला. राजूरची राईस मिल व दूध शीतकरण केंद्र बंद झाले. परिवर्तन लढाईत सुरुवातीला तेव्हा एकटा होतो. आता जनता व शेतकरी चळवळीतील, सहकारातील बिनीचे शिलेदार नेते बरोबर आहेत. माजी मंत्री पिचडांनी पिचविलेले ऊस उत्पादक शेतकरी सभासद आपल्याबरोबर आहेत. तालुक्यातील संगमनेरसारख्या सहकारी संस्था पुन्हा ऊर्जितावस्थेत आणू, असा विश्वास आमदार लहामटे यांनी व्यक्त केला.
गणेश कोकणे, चंद्रभान नवले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....
जिल्हा बँकेची निवडणूक लढणारच
अगस्तीत होणारी शेतकऱ्यांच्या घामाची लूट थांबली पाहिजे. सत्ता नको, पण सत्य हवे. त्यासाठी टोकाचा संघर्ष करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी कंबर कसावी. सामान्य शेतकरीदेखील कारखाना चांगला चालवितात, अशी राज्यात अनेक उदाहरणे आहेत. अगस्तीने १९९२ ते २०१९ या काळात संगमनेरच्या तुलनेत १२८ कोटी रुपये कमी भाव दिला आहे. सभासदांचे नुकसान केले नाही तर त्यांच्या पैशांवर दरोडा टाकला आहे. आपण जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढविणारच, असा निर्धार दशरथ सावंत यांनी व्यक्त केला.
....