नगरमध्ये ५० टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:21 AM2021-09-11T04:21:55+5:302021-09-11T04:21:55+5:30
अहमदनगर : नगरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील अडीच लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ...
अहमदनगर : नगरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील अडीच लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नगरमधील रुग्णसंख्या घटू लागली असून, उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नगरमधील रुग्णांचा आकडा दीड हजार पार गेला होता. अनलॉकनंतर शहरातील रुग्णसंख्या ग्रामीणच्या तुलनेत घटली आहे. गुरुवारी नगरमध्ये ६४ नवे रुग्ण आढळून आले. महिनाभरातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. त्यात गणेशोत्सव सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. असे असले तरी नगरमधील ५० टक्के म्हणजे २ लाख ५८ हजार नागरिकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. नगर शहराची सध्याची लोकसंख्या ५ लाख असून, त्यापैकी १ लाख ९८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तसेच आतापर्यंत ६० हजार नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे महापालिकेने कोविड केअर सेंटर बंद केले असून, मागील आठवड्यात दररोज सधारण २० ते २५ नवे रुग्ण आढळून येत होते. शहरातील रुग्णसंख्या घटू लागली असून, लसीकरणाचेही प्रमाण वाढले आहे.
....
शहरातील १ लाख ९८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तसेच ६० हजार नागरिक कोरानातून बरे झाले आहेत. त्यामुळे २ लाख ५८ हजार नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे.
- डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आराेग्य अधिकारी, महापालिका