अर्धशतक धावणारी अँटीक मोटारसायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:44 PM2019-07-14T14:44:01+5:302019-07-14T14:44:18+5:30
युज अँड थ्रो..च्या जमान्यात राहुरी येथे तीन पिढ्यांपासून राजदूत मोटारसायकल रस्त्यावरून सहज धावत आहेत.
भाऊसाहेब येवले
राहुरी : युज अँड थ्रो..च्या जमान्यात राहुरी येथे तीन पिढ्यांपासून राजदूत मोटारसायकल रस्त्यावरून सहज धावत आहेत. अॅड़ स्व़ प्रभाकर मेहेत्रे यांनी २७ नोव्हेंबर १९६८ मध्ये ३,१०० रूपयांना खरेदी केलेली एम.एच.यू-१७६० ही मोटारसायकल अँटीक पीस ठरला आहे़ अनेकांनी मोठी रक्कम देऊनही मेहेत्रे परिवाराने ऐतिहासिक ठेवा म्हणून मोटारसायकलची जपवणूक केली आहे़
अविनाश मेहेत्रे व त्यांचा मुलगा असा तीन पिढ्यांचा मोटारसायकलचा ऋणानुबंध राहिला आहे़ राहुरी तालुक्यात १९६८ मध्ये पुण्यावरून चार मोटारसायकली आणण्यात आल्या होत्या़ ही मोटारसायकल जागेवर २,७०० रूपयांना खरेदी करण्यात आली़ याशिवाय ४०० रूपये अन्य खर्च आला़ अॅड़ प्रभाकर मेहेत्रे यांनी राहुरी न्यायालयात ये-जा करण्यासाठी मोटारसायकल खरेदी केली होती़ त्याकाळात मोटारसायकल बघण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असे़ राम नारायण दरक व विश्वनाथ शिंदे यांनी काळाच्या ओघात मोटारसायकली विकल्या़ मात्र मेहेत्रे यांची मोटारसायकल लकी ठरली़ कुठलाही अपघात न करता अखंड ५१ वर्ष अविरत सेवा दिली़ टायर,ट्यूब व पेट्रोल टाकले की हाफ किकमध्ये मोटारसायकल चालू होते़ काळाच्या ओघात मोटारसायकलीला लागणारे स्पेअरपार्ट मिळत नाही़ तरी देखील डुप्लीकेट स्पेअरपार्टच्या माध्यमातून मोटारसायकलची सेवा सुरू आहे़ तब्बल १५० पेक्षा अधिक लोकांना मेहेत्रे यांच्या मोटारसायकलच्या सहाय्याने प्रशिक्षण मिळाले़ त्यामध्ये सत्यवान पवार, संजय कुलकर्णी आदींचा समावेश आहे़ वन किक स्टार्ट होणारी मोटारसायकल एक लिटरला ४२ किलोमीटर अॅव्हरेज देते़ मोटारसायकलचा रंगही गेल्या ५१ वर्षात बदलण्यात आलेला नाही़ मेहेत्रे परिवारालाही ऐतिहासिक मोटारसायकलचा अभिमान आहे़ अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मोटारसायकला हार घालून आनंद व्यक्त के ला होता़
वडिलांची आठवण
गेल्या ५१ वर्षात मोटारसायकलने अविरत सेवा दिली आहे़ कधीही धोका दिला नाही़ नवीन बुलेट घेऊन देतो ही गाडी आम्हाला द्या.. अशा आॅफरही आल्या़ मात्र युनिक पीस व वडिलांची आठवण म्हणून मोटारसायकल विकली नाही़ प्रेरणास्थान म्हणून मोटारसायकल कुणालाही विकली नाही़ -अविनाश प्रभाकर मेहेत्रे, मोटारसायकल मालक, राहुरी.