अहमदनगरमधील आपेगावकरांना करावा लागतोय जीवघेणा जलप्रवास; रस्त्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 10:52 AM2022-02-04T10:52:59+5:302022-02-04T10:55:02+5:30
दोन हजार लोकसंख्येचे आपेगाव ढोरा नदीपात्रामुळे विभागले गेले आहे.
- अनिल साठे
शेवगाव (जि. अहमदनगर) : आतापर्यंत रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पाणंद, डोंगराळ भागातून नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल. मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शेवगाव तालुक्यातील आपेगावकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे.
दोन हजार लोकसंख्येचे आपेगाव ढोरा नदीपात्रामुळे विभागले गेले आहे. गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना धोकादायक जलप्रवास करावा लागतो आहे. लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनास जाग येणार आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांची व्यथा...
या गावातील अण्णासाहेब बोरुडे म्हणाले, छातीइतक्या खोल पाण्यातून आम्हाला रोज येणे-जाणे करावे लागते आहे. आजवर पाय घसरून दोघांचा जीव गेला आहे. पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत नेहमीच भांडतो. पण आश्वासनाच्या पलीकडे काही मिळाले नाही, असे राहुल शेळके म्हणाले.
सोबत नसेल तर बुडते शाळा
शाळकरी विद्यार्थी दादा शेळके म्हणाला, माझे पप्पा आजारी आहेत. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसते. शाळेत जायचे म्हटले की, पालकांना कामधंदा सोडून शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरून जाताना भीती वाटते. कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळादेखील बुडते.
मतदानावर बहिष्कार
शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ, ज्ञानेश्वर शेळके आदी ग्रामस्थांनी. पूल न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले.