आढळगावच्या स्मशानभूमीचे रूपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:36+5:302021-03-28T04:19:36+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य तसेच परिसरातील हागणदारीसह काटेरी झुडपांमध्ये हरवलेली स्मशानभूमी ही गावाची नकोशी ...
आढळगाव :
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य तसेच परिसरातील हागणदारीसह काटेरी झुडपांमध्ये हरवलेली स्मशानभूमी ही गावाची नकोशी ओळख बनली होती. त्यामुळे अंत्यसंस्कारास उपस्थिती मृतांच्या आप्तेष्टांना अडचणीची झाली होती. ही ओळख बदलण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते आणि जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे रूपडे पालटणार आहे.
देव नदीच्या तीरावर असलेल्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा प्रश्न गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित होता. स्मशानभूमीच्या परिसरातील गैरसाेयींमुळे ग्रामस्थ आणि राजकीय पुढाऱ्यांसह मृताच्या लगतच्या पाहुण्यांचाही अंत्यसंस्कारास उपस्थिती टाळण्याकडे कल होता. ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत यांच्यासह सुभाषलाल गांधी, देवराव शिंदे, डाॅ. अशोक वाकडे, बळीराम बोडखे, जिजाराम डोके यांच्यासह गावातील जाणकरांनी आमदार पाचपुते यांच्याकडे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली. पाचपुते यांनी स्थानिक विकास निधीमधून दहा लाख तसेच जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
स्मशानभूमीसाठी सुरुवातीला संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून उर्वरित विकास कामांसाठीही पुढील काळात निधी देण्याचे नियोजन आमदार बबनराव पाचपुते यांनी केल्याचे जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी सांगितले.
---
२७ आढळगाव
आढळगाव येथे काटेरी झुडपांमध्ये हरवलेल्या स्मशानभूमीतील मृतांच्या दहनाचा लोखंडी सांगाडाही गायब आहे.