श्रीगोंदा तालुक्यात बहरणार सफरचंदाच्या बागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:03+5:302021-02-17T04:26:03+5:30
आढळगाव : ऊस आणि लिंबू बागांचे आगार अशी ओळख असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात द्राक्षे, डाळिंबांनंतर आता सफरचंदाच्या बागा बहरणार आहेत. ...
आढळगाव : ऊस आणि लिंबू बागांचे आगार अशी ओळख असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात द्राक्षे, डाळिंबांनंतर आता सफरचंदाच्या बागा बहरणार आहेत. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या पहाडी भागामध्ये आढळणाऱ्या सफरचंद लागवडीचा रंगनाथ कळमकर, विजयराव केदारे आणि टाकळीकडेवळीत येथील खामकर बंधूंचा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. कळमकर आणि केदारे यांच्या मांडवगण रस्त्यावरील बागेत सफरचंदाच्या झाडांवरील पांढऱ्याशुभ्र फुलांचा बहर शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे.
मांडवगण रस्त्यावरील शेतात कळमकर व केदारे यांनी सफरचंदाची सहाशे झाडे लावली आहेत. या झाडांना बहर आला असून, पहिल्या वर्षीचा बहर प्रायोगिक तत्वावर धरण्यात येतो. त्यानंतर पूर्ण क्षमतेने सफरचंदाचे उत्पन्न घेण्यात येणार आहे. टाकळीकडेवळीत येथे खामकर बंधूंनी दीड एकर क्षेत्रावर सफरचंदाच्या चारशे वीस रोपांची यंदा लागवड केली आहे.
व्यावसायिक तत्वावर होणारी सफरचंदाची लागवड आता वाढत आहे. उष्ण प्रदेशात येणारे सफरचंदाचे वाण विकसित करणारे हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्मा यांच्या यशस्वी प्रयोगांचा अभ्यास करुन टाकळीकडेवळीत येथील राजेंद्र आणि योगीराज खामकर यांनी सफरचंदाची बाग फुलविण्याचे ठरवले. इंटरनेटच्या माध्यमातून सखोल अभ्यास केला. राजस्थान आणि गुजरात या उष्ण प्रदेशात येणारे ‘एचआरएमएन - ९९’ हे वाण लागवडीसाठी निवडले. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथून रोपे आणून त्यांची लागवड केली आहे.
............
अशी केली लागवड
पाणी साठून न राहणारी, निचरा होणारी ५० गुंठे जमीन तयार केली. बारा बाय अकरा फूट अंतरावर दोन फूट खोल खड्डे घेऊन त्यामध्ये तुरीचा भुसा, ऊसाच्या पाचरटाचा भुगा आणि शेणखत टाकून कंपोस्ट खत तयार केले. सिंचनासाठी ठिबकची व्यवस्था केली. ८० रुपये प्रतिरोप या दराने ‘एचआरएमएन - ९९’ या वाणाची ३८० तर गोल्डन डाॅरसेट आणि ॲनी या वाणांची प्रत्येकी २० रोपे अशा ४२० रोपांची लागवड खामकर यांनी केली आहे.
.......................
दुसऱ्यावर्षी येतो बहर
बहर धरण्यासाठी लागवडीनंतर दोन वर्षे वाट पाहावी लागते. दुसऱ्यावर्षी प्रायोगिक तत्वावर तर तिसऱ्यावर्षी पूर्ण क्षमतेने बहर धरता येतो.
कळमकर आणि केदारे यांच्या सफरचंदाच्या झाडाला यावर्षी चांगला बहर आला आहे. फुलांनी लगडलेली सफरचंदाची झाडे परिसरातील शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहेत.
....................
पारंपरिक शेतीऐवजी वेगळी वाट निवडण्याचा आम्ही प्रयत्न आम्ही केला असून, हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्मा यांच्या नर्सरीमधून उष्ण प्रदेशात येणाऱ्या सफरचंदाच्या वाणाची लागवड केली आहे.
- राजेंद्र व योगीराज खामकर, टाकळीकडेवळीत
...............
फोटो : मांडवगण रस्त्यावरील रंगनाथ कळमकर आणि विजयराव केदारे यांची बहरलेली सफरचंदाची बाग.