अर्ज नगर जिल्हा परिषदेसाठी, परीक्षा मात्र नागपूर, वर्ध्याला
By चंद्रकांत शेळके | Published: July 20, 2024 02:39 PM2024-07-20T14:39:55+5:302024-07-20T14:41:08+5:30
जिल्हा परिषद नोकर भरतीची तऱ्हा: उमेदवारांची गैरसोय, अनेकजण मूकणार परीक्षेला
चंद्रकांत शेळके, अहमदनगर : गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद नोकर भरतीला अखेर मुहूर्त लागला. मात्र, आरोग्यसेवक व इतर पदांसाठी उमेदवारांना परीक्षेसाठी थेट नागपूर, वर्धा, मुंबई असे दूरवरचे केंद्र मिळाल्याने उमेदवारांची मोठी गैरसोय झाली आहे. येथे परीक्षेला जाण्यासाठीच चार ते पाच हजारांचा खर्च येणार असल्याने कितीजण परीक्षेला हजेरी लावतात, याविषयी साशंकताच आहे.
नगरसह राज्यात जिल्हा परिषदांची १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. नगर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात ५ ऑगस्ट २०२३ ला प्रसिद्ध केली होती. यात जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गांतील ९३७ पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक ७२७ पदे आरोग्य विभागाची आहेत. या भरतीसाठी जिल्ह्यातून ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले. अर्ज भरल्यानंतर पहिल्या टप्प्यात १९ पैकी ११ संवर्गांची परीक्षा कशीबशी डिसेंबर २०२३ पर्यंत झाली. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आहेत त्या आरोग्य सेवक (पुरुष ५० टक्के हंगामी फवारणी), आरोग्य सेवक (पुरुष इतर ४० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा पाच संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक गेल्या सहा महिन्यांपासून जाहीर होत नव्हते. अखेर ते २७ जून २०२४ रोजी ते जाहीर झाले.
दरम्यान, आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष या पदांसाठी मोठ्या प्रमाणात जागा असल्याने येथे अर्जही अधिक प्राप्त झाले आहेत. उमेदवारांनी परीक्षेसाठी अहमदनगर, संभाजीनगर, पुणे अशा जवळच्या परीक्षा केंद्रांचे पर्याय अर्ज भरताना भरले. मात्र, जेव्हा हाॅलतिकीट प्राप्त झाले, त्यात अनेकांना नागपूर, वर्धा, मुंबई, ठाणे, अमरावती असे दूरवरचे परीक्षा स्थळ देण्यात आले आहे. परीक्षेसाठी एवढे दूर कसे पोहोचणार, असा प्रश्न उमेदवारांना व त्यांच्या पालकांना पडला आहे. याबाबत अनेक उमेदवारांनी शासनाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
आरोग्य सेवक (५० टक्के हंगामी फवारणी) या पदासाठी १८७ जागा असून, २३ व २४ जुलै २०२४ रोजी या पदाची परीक्षा आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना जवळपास सर्वच राज्यात ठिकठिकाणी दूरवरचे परीक्षा केंद्र मिळाले आहेत.
का मिळाले दूरवरचे केंद्र
शासन नियुक्त आयबीपीएस या कंपनीमार्फत जिल्हा परिषदेच्या या पदांसाठी ॲानलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी कंपनीकडून त्या त्या जिल्ह्यातील खासगी, शासकीय संगणक प्रयोगशाळा तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आल्या. नगरमध्ये केवळ सहा प्रयोगशाळा कंपनीला मिळाल्या. त्यावर ३५० ते ४०० उमेदवारांचीच क्षमता आहे. मात्र, त्या तुलनेत अर्जांची संख्या जास्त असल्याने त्यांना इतर जिल्ह्यांतील केंद्र देण्यात आली आहेत.