विखे गट, मंत्री गडाख, कोल्हे यांच्यासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:41+5:302021-01-21T04:19:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संगमनेर तालुक्यातून थोरात गटाचे माधवराव कानडे, इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संगमनेर तालुक्यातून थोरात गटाचे माधवराव कानडे, इतर मागास प्रवर्गातून अनिल शिरसाठ, विमुक्त जाती व भटक्या जमातीतून गणपत सांगळे यांनी बुधवारी अर्ज दाखल केले. तसेच माजीमंत्री तथा आ. राधाकृष्ण विखे यांच्यासह मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासाठी अर्ज नेण्यात आले असून, दिवसभरात एकूण २२ जणांनी १६३ अर्ज घेतले आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येत आहेत. मंगळवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. मोनिका राजळे, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी अर्ज नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी मृद व जलसंधारणमंत्री गडाख, माजीमंत्री तथा आ. विखे गट, भाजपाच्या माजी आमदार कोल्हे, सेनेचे माजी आमदार विजय औटी, जिल्हा बँकेचे शंकरराव पिसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासाठी त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३१६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. शनिवार व रविवार हे दोन दिवस अर्ज कार्यालय बंद राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत २५ जानेवारी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस मिळणार आहेत.
.......
कोल्हे गटाने घेतले २५ अर्ज
भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटासाठी त्यांचे समर्थक रंगनाथ लोंढे यांनी सर्वाधिक २५ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तसेच जामखेडचे अमोल राळेभात, पाथर्डीचे त्रिंबक अकोलकर, राहुरीचे तान्हाजी धसाळ, कर्जतचे बाळासाहेब गांगर्डे, पारनेरचे चंद्रशेखर कावरे यांनी प्रत्येकी १५ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.