पोपटराव पवारांसह कर्डिले, कोकाटे, लामखडे, घिगेंचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:14+5:302020-12-31T04:21:14+5:30
केडगाव : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्याने नगर तालुक्यात उमेदवारांची अक्षरशः लगीनघाई सुरू होती. गर्दीमुळे तहसील ...
केडगाव : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्याने नगर तालुक्यात उमेदवारांची अक्षरशः लगीनघाई सुरू होती. गर्दीमुळे तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह माजी जि. प. सदस्या कालिंदी लामखडे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, प्रवीण कोकाटे, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता पाटील सप्रे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास कर्डिले, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, आदी मातब्बरांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
नगर तालुक्यातील ५९ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. यामुळे ऐनवेळी तयार झालेल्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी लगीनघाई सुरू होती. शेवटचा दिवस असल्याने गावातील बहुतांशी नेते व कार्यकर्ते दिवसभर तहसील कार्यालयात ठाण मांडून होते. विशेष म्हणजे अनेक गावांतील उमेदवारांनी एकत्र येत आपले अर्ज दाखल केले.
निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील व सहायक अधिकारी अभिजित बारवकर निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. तसेच ध्वनिक्षेपकावरून उमेदवारांसाठी आवश्यक सूचना सांगत होते. तालुक्यातील अनेक मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी सातव्यांदा अर्ज दाखल केला. माजी जि. प. सदस्या कालिंदी लामखडे (निंबळक), बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे (तांदळी वडगाव), प्रवीण कोकाटे (चिंचोडी पाटील), माजी पंचायत समिती सदस्य दत्ता पाटील सप्रे, डॉ. बबनराव डोंगरे (नवनागापूर), माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ जाधव (निमगाव वाघा), नगर तालुका दूध संघाचे संचालक पुष्पा कोठुळे (खडकी), गुलाबराव कार्ले (खंडाळा), राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास कर्डिले (बुऱ्हाणनगर), भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष ज्योती भोर, बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे, आदींनी अर्ज दाखल केले. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
---
बिनविरोधसाठी बैठकांच्या फेऱ्या सुरूच..
नगर तालुक्यातील हिवरे बाजार, खडकी, खंडाळा, तांदळी वडगाव, अकोळनेर, घोसपुरी, नवनागापूर, आंबिलवाडी, शिराढोण, आदी गावांत बिनविरोध निवडणूक करण्याबाबत प्राथमिक बैठका झाल्या आहेत. तथापि, अंतिम निर्णय न झाल्याने बैठकांच्या फेऱ्या ४ जानेवारीपर्यंत सुरूच राहणार आहेत.