साई संस्थान कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 02:20 PM2019-07-05T14:20:41+5:302019-07-05T14:21:47+5:30
साई संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा व मागील फरक या महिनाअखेर देण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सांगितले़
शिर्डी : साई संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा व मागील फरक या महिनाअखेर देण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सांगितले़
साई संस्थान व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन मान्सून धमाका केला आहे़ या व्यवस्थापनाची मुदत तीन आठवड्यात संपत आहे़ व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर हावरे यांनी निर्णयाबाबत माहिती दिली़ यावेळी विश्वस्त अॅड़ मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्हे, राजेंद्र सिंग, नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे आदींची उपस्थिती होती़
संस्थानने कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता़ या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी संस्थान व्यवस्थापनाबरोबरच गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता़ अखेर बुधवारी शासनाने याबाबत संस्थान व्यवस्थापनानेच निर्णय घ्यावा, असे पत्र संस्थानला पाठवले़ त्यानंतर गुरुवारी व्यवस्थापनाने वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला़
१ जानेवारी २०१६ पासूनच्या फरकाचे जवळपास ५७ कोटी रूपये या महिनाअखेर कामगारांच्या खात्यात जमा होतील़ १ हजार ९५० कायम कर्मचाºयांना याचा लाभ होईल़ दरवर्षी यामुळे संस्थानवर २० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे़
याशिवाय अनुंकपामधील ६३ कर्मचाºयांना सेवेत घेण्याबरोबरच पूर्वीच्या अनुकंपातील कंत्राटी कामगारांनाही कायम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला़ गेल्या वर्षीपासून संस्थान रूग्णालयात आऊट सोर्सिंगमध्ये काम करणाºया नर्सिंगच्या ४१ कर्मचाºयांना चाळीस टक्के पगारवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला़
यात साईबाबा रूग्णालयातील सहा व साईनाथच्या ३५ नर्सेसला याचा लाभ होईल़ स्टाफिंग पॅटर्न तयार करण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे़ स्टाफिंग पॅटर्न करून त्याला राज्य शासनाची मान्यता घेतल्यानंतरच कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया करता येईल़ त्यासाठी चार-पाच महिने सबुरी ठेवा, असेही डॉ़ हावरे यांनी सांगितले़
साईआश्रममधील आऊट सोर्सिंगच्या अतिरिक्त झालेल्या १२५ कर्मचाºयांच्या प्रकरणाचा आढावा घेऊन व्यवस्थापनापुढे मांडू असे मुगळीकर यांनी सांगितले़ पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या दर्शनरांग व शैक्षणिक संकुलाचे काम सुरू आहे़ सोलर प्लँट व नॉलेज पार्कचे टेंडर काढण्यात आले आहे़ संस्थान व शहरासाठी २० टन क्षमतेच्या घनकचरा प्रकल्पासही मान्यता दिल्याचे हावरे यांनी सांगितले़