कोविड सेंटर टीमचे कौतुक; प्रशासनाचे टोचले कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:16+5:302021-05-10T04:21:16+5:30
श्रीगोंदा : तालुक्यात कोळगाव, घारगाव, लोणी व्यंकनाथ येथील कोविड सेंटर्सच्या कामगिरीचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...
श्रीगोंदा : तालुक्यात कोळगाव, घारगाव, लोणी व्यंकनाथ येथील कोविड सेंटर्सच्या कामगिरीचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कौतुक केले, मात्र ग्रामीण रुग्णालयातील १०० चा ऑक्सिजन वितरणगृह प्रकल्प व ५० बेडचे अतिरिक्त सेंटर उभे करण्यासाठी विलंब का केला, असे म्हणत जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाचे कान टोचले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी रविवारी कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मवीर भाऊराव पाटील कोविड सेंटर, शिवशंभो कोविड सेंटर घारगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व व्यंकनाथ कोविड सेंटर लोणी व्यंकनाथ ग्रामीण रुग्णालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वसतिगृहातील कोविड सेंटरला भेट दिली.
कोरोना तपासणी व लसीकरण वेगाने करण्याबाबत प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, अपर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगीता ढोले यांना बैठक घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करावी. अहवाल पॉझिटिव्ह आला तर कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन करावे, अशा सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्याधिकारी यांनी कोळगाव व लोणी व्यंकनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. तुम्हाला कोरोना तपासणी व लसीकरणाची सेवा चांगली मिळते का, याबाबत चौकशी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील रुग्णांची विचारपूस केली. तुम्हाला जेवण चांगले मिळते का, रुग्णांबरोबर आलेल्या एका नातेवाइकास भोजन थाळी योजनेतून भोजनाची व्यवस्था करा, असे सांगितले.
कोविड सेंटरला मदत करा
कोविड सेंटर्स ही सेवाभावी वृत्तीने सुरू आहेत, याचा अभिमान वाटतो. कोविड सेंटरवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मदतीला द्या. आवश्यक त्या औषधांचे सहकार्य करा, अशा सूचना भोसले यांनी केल्या.
--
कारवाई का केली नाही?
लोणी व्यंकनाथ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी शैलजा डांगे या कोविड सेंटरला मदत करत नाहीत, अशी तक्रार उपसरपंच मितेश नाहाटा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार प्रदीप पवार यांना विचारले. यासंदर्भात आपणाकडे लेखी तक्रार आली का, पवार म्हणाले तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले कारवाई का केली नाही?
---
जिल्हाधिकारी पोहोचले थेट कोरोनाबाधिताच्या घरी..
जिल्हाधिकारी यांनी विचारले, श्रीगोंदा शहरात होमक्वाॅरंटाइन कोरोनाबाधित किती आहेत असे मुख्याधिकारी देवरे यांना विचारले. त्यांनी २६ रुग्ण तसे असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी थेट एका होम क्वाॅरंटाइन शिक्षकाच्या घरी गेले. घरी गेले तर ते शिक्षक घरी नव्हते. त्या शिक्षकाची पत्नी घरी होती. शिक्षक पत्नी म्हणाली, मी व मुलगी पॉझिटिव्ह आहोत. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, तुम्ही कोरोनाबाबत दिलेले आदेश मोडतात हे योग्य नाही. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. तुम्ही तत्काळ शासकीय अथवा खासगी रुग्णालयात क्वाॅरंटाइन व्हावा, असे त्यांना सांगितले. तसेच प्रशासनालाही सर्व होम क्वाॅरंटाइन रुग्णांना कोविड सेंटरमध्ये क्वाॅरंटाइन करण्याचे आदेश दिले.