गट-तट न पाहता छावण्या मंजूर करा : रोहित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:48 PM2019-03-15T16:48:14+5:302019-03-15T16:48:22+5:30
दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे.
अहमदनगर : दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही गट-तट न पाहता छावण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन छावण्या, टँकर व कुकडीच्या आवर्तनासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यात मोठ्या संख्येने छावण्यांची गरज असून प्रशासनाने तातडीने छावण्या मंजूर कराव्यात. याशिवाय काही ठिकाणी छावण्यांना मंजुरी मिळूनही छावण्या सुरू होत नसल्याने जनावरांची गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज आहे. परंतु टँकर सुरू झालेले नाहीत. तातडीने कुकडीचे आवर्तन सोडून गावतलाव भरून घ्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन छावण्या, टँकर सुरू करण्याबाबत सांगितले. मंजूर केलेल्या छावण्या आठ दिवसांत सुरू न केल्यास त्या रद्द करण्याची कार्यवाही होत असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले, असे पवार म्हणाले.
वादापेक्षा पिडितांना मदत करा
मुंबईतील पूल दुर्घटनेबाबत बोलताना पवार म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. अशा प्रसंगी पिडितांना मदत करण्यापेक्षा तो पूल रेल्वेकडे होती की महापालिकेकडे, असा वाद करून जबाबदारी ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू झाला आहे. पूल कोणाच्याही अधिकारात असला तरी प्रथम त्याची सुरक्षा महत्त्वाची आहे.
कार्यकर्ता म्हणून प्रचारात उतरणार
अहमदनगर लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी खास आपल्याकडे सोपविली असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले, प्रचाराची जबाबदारी सर्वांकडेच आहे. शरद पवार, अजित पवार हेही राज्यभर भिरत आहेत, एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा प्रचार करणे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मीही जेथे कोठे जाईल, तेथे युवकांना, कार्यकर्त्यांना भेटत असतो.