पढेगावात दारुबंदीचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 05:51 PM2018-04-21T17:51:11+5:302018-04-21T17:52:21+5:30
कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात अवैध धंदेही तेजीत आहे. त्यामुळे शनिवारी सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून पढेगाव गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला.
कोपरगाव : तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात अवैध धंदेही तेजीत आहे. त्यामुळे शनिवारी पढेगाव सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. त्याचाच प्रतिपात पढेगाव येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात दोन दिवसापूर्वी अज्ञात इसमांनी देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या फोडल्याने गावातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा चौक गावाचा मुख्य रस्ता असून शाळकरी मुलांचा नित्याने येण्या जाण्याचा रस्ता आहे. त्यामुळे शनिवारी सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून त्यात सवार्नुमते गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला.
नागरिकांनी शाळकरी मुलामुलींना, महिलांना या व्यवसायापासून होत असलेला त्रास आणि मंदिराच्या परिसरात धार्मिक भावना दुखावण्याचे कृत्य करणारे इसमांचा सी.सी.टी,व्ही.फुटेज चेक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा ठराव यावेळी नागरिकांनी मांडून ठरावाच्या प्रती पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, तहसिलदार यांना तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गावचे सरपंच प्रकाश शिंदे यांनी दिली.
पोलीस यंत्रणा सुस्त
शासनाच्या नियमानुसार शाळेपासून पाचशे मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करणे अथवा सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे, परंतु खुद्द पढेगावात अवैध विक्रीची दारू दुकाने चक्क शाळेपासून पन्नास फूट अंतरावर असताना मात्र पोलीस यंत्रणा नेमकी काम तरी काय करते हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही .