राहाता ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:56+5:302021-05-20T04:21:56+5:30
कोविड संकटात ऑक्सिजन अभावी अनेक निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन बेडअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची झालेली ससेहोलपटही ...
कोविड संकटात ऑक्सिजन अभावी अनेक निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन बेडअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची झालेली ससेहोलपटही भयंकर होती. या संकटावर कायमस्वरूपी उतारा म्हणून आमदार विखे पाटील यांनी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची मागणी करून याचा पाठपुरावा शासनाकडे केला होता.
राहाता तालुक्यात ३ ग्रामीण रुग्णालये, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालये मोठ्या संख्येने आहेत. कोविड संकटाच्या दुसऱ्या संक्रमणात रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. कोविड रुग्णांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांसह शिर्डी संस्थानच्या व प्रवरा कोविड सेंटरमध्ये बेडची सुविधा उपलब्ध झाली असली तरी सर्वच ठिकाणी ऑक्सिजनच्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याकडे आमदार विखे यांनी लक्ष वेधले होते. शिर्डी येथे संस्थानने प्रकल्प उभारला असला तरी तिथे निर्माण होणारा ऑक्सिजन हा संस्थानच्या रुग्णालयालाच उपयोगी पडेल. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व इतर रुग्णालयांना पुन्हा ऑक्सिजनची टंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून कायमस्वरूपी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्याची मागणी आमदार विखे पाटील यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय राहाता येथे १.५६ कोटी रुपये खर्चाच्या ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीस मंजुरी देऊन कामाची वर्कऑर्डरसुद्धा दिलेली आहे.
या प्रकल्पातून प्रतिदिन १२५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची क्षमता आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीसाठी लिक्विडची आवश्यकता नाही. हवेतूनच ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याची माहिती देतानाच, या प्रकल्पासाठी २०० केव्ही क्षमतेचे जनरेटर, राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात ४० बेडच्या प्रकल्पासाठीच्या ऑक्सिजन पाइपलाइनकरिता आमदार निधीतून निधीची उपलब्धता करून देणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.