मार्च महिन्यातच ‘एप्रिल कूल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:38+5:302021-03-28T04:19:38+5:30
बाभळेश्वर : लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने तीन वर्षांपासून दरवर्षी राष्ट्रीय ...
बाभळेश्वर : लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने तीन वर्षांपासून दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत ‘एप्रिल कूल’ असा एक अनोखा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी मार्च महिन्यातच जास्त तापमान असल्याने मार्च महिन्यातच ‘एप्रिल कूल’ हा उपक्रम राबविला जात आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण गायकर यांच्या संकल्पनेतून प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, डॉ. महावीरसिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपासून अनोखा उपक्रम राबविण्यात येतो. मात्र, यावर्षी मार्च महिन्यातच जास्त तापमान असल्याने सदर उपक्रम मार्च महिन्यापासूनच राबविण्यात येत आहे. सध्या प्राणी आणि पक्षी पाण्याच्या शोधासाठी इतरत्र धाव घेताना दिसून येतात. आधीच कोरोना आणि सध्या वाढते तापमान यामुळे मनुष्यही हैराण आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर पाण्याची आणि धान्याची सोय केली आहे. परिसरातील झाडांना पालापाचोळ्याचे मल्चिंग करून पाणी दिले जात आहे.
यावेळी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण गायकर, प्रा.अमोल सावंत, प्रा.महेश चंद्रे, प्रा.स्वप्नील नलगे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. उपक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो स्वयंसेवक कदम अपर्णा, विश्वजित घोटेकर, हर्षल तांबे, भाग्यश्री नेहारकर, देवयानी गोंदकर, रुचिका चौधरी, अनुराग देशमुख, अनिकेत राऊत, निकिता भालेराव, घुगे गौरेश आणि सर्व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.