अरणगाव आठ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:09+5:302021-03-29T04:15:09+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील अरणगाव येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तालुका प्रशासनाने गावात आठ दिवस कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर ...
केडगाव : नगर तालुक्यातील अरणगाव येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तालुका प्रशासनाने गावात आठ दिवस कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर केला आहे. अनेक रुग्णांनी परस्पर तपासणी व उपचार सुरू केल्याने अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही.
नगर तालुका शहराजवळ असल्याने शहरालगत असलेल्या गावांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील कोविड सेंटर तीन महिन्यांपूर्वीच बंद झाल्याने तालुक्यातील शेकडो रुग्ण सध्या शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. तालुक्यात १ मार्च ते २५ मार्चपर्यंत ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अरणगावमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले.
अरणगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तहसीलदार उमेश पाटील यांनी शनिवारी आदेश काढून गावातील बहुतांश भाग ८ एप्रिलपर्यंत कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर केला. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले.
---
...हा भाग झाला बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा समितीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार
गावठाण, मारुतीनगर, दळवी मळा, शिंदेवाडी, नाट मळा याठिकाणी तहसीलदारांच्या आदेशान्वये कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणचा परिसर संपूर्णपणे प्रतिबंधित करण्यात येत आहे.
तसेच जाधव मळा, ढमढेरे वस्ती, मतकर वस्ती, टी.बी. सेंटर याठिकाणी तहसीलदारांच्या आदेशान्वये बफर झोन म्हणून घोषित केले आहे. याठिकाणी अत्यावश्यक सेवा (दवाखाने आणि मेडिकल) पूर्ण वेळ सुरू राहतील. मात्र, इतर सर्व दुकाने आठ दिवस ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. वरील नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास अतिशय कडक आणि
कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
---
अरणगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना अधिकृत संख्या कमी असली तरी संपर्कात आलेले लोक टेस्टिंगसाठी पुढे येत नाहीत. आजारी असेल, तर डॉक्टरकडे जातात. औषधे घेतात आणि घरीच राहतात. मात्र, कोरोना टेस्टिंग करून घ्यायला पुढे कोणी येत नाही.
-स्वाती मोहन गहिले,
सरपंच, अरणगाव
---
प्रशासनाने गावात लॉकडाऊन करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्य व्यावसायिकांच्या दृष्टीने खूप नुकसान करणारा आहे. कामगारांचे अतोनात हाल होतील. प्रशासनानेही सहकार्य करावे. काही नियम ठरविले, तर सोशल डिस्टन्सचे पालन करून प्रशासनास नक्कीच सहकार्य करतील.
-प्रंशात गहिले,
ग्रामस्थ, अरणगाव
--
२८अरणगाव