पीक विमा कंपनीची मनमानी, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:23+5:302021-06-01T04:16:23+5:30
अहमदनगर : शेतकऱ्यांनी पीक विमा भरून वर्ष उलटून गेले. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. विमा कंपनीच्या मनमानी ...
अहमदनगर : शेतकऱ्यांनी पीक विमा भरून वर्ष उलटून गेले. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. विमा कंपनीच्या मनमानी विरोधात शेतकरी मराठा संघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तक्रार केली.
मागीलवर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविला होता. खरीप पिकांचे अतिवृष्टी, वादळामुळे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने नुकसानभरपाई दिली नाही. यासंदर्भात शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन पीक विम्याची संरक्षित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधित विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गतवर्षी अहमदनगर जिल्हयातील ४ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. शेतकऱ्यांनी त्यांचा हिस्सा भरला. पीक विमा भरून एक वर्ष उलटून गेले. सध्या नवीन खरिपाची तयारी सुरू आहे. मागील नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार होईल. परंतु, विमा कंपनीकडून अद्याप पात्र लाभार्थींची यादी जाहीर केली गेली नाही. याबाबत कृषी अधीक्षकांशी संपर्क केला. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नसून, संबंधित कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश द्यावा, असे दहातोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
...
फोटो- ३१संभाजी दहातोंडे