विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक, तक्रारीसाठी सहा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:52+5:302021-09-16T04:27:52+5:30
अहमदनगर : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून ...
अहमदनगर : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून आता यासाठी सहा विविध पर्याय तक्रार करण्यासाठी देण्यात आले आहेत.
मागील पंधरा दिवसांपूर्वी अतिवृष्टीने शेवगाव, पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासह जनावरांचा चारा, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र तक्रार ७२ तासांच्या आत करण्यासाठी दोनच पर्याय देण्यात आले होते. ऑफलाईन पद्धतीनेही पीक नुकसानीची तक्रार स्वीकारली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. आता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन लेखी तक्रार नोंदविता येणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे एकूण किती नुकसान झाले याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांच्याशी संर्पक केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच महसूल प्रशासनाकडेही अद्याप याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नाही.
-----
आदी हे होते दोनच पर्याय...
१) शेतकऱ्यांना विमा कंपनीचे ॲप डाऊनलोड करून त्यावरून पूर्ण माहिती भरून तक्रार करावी लागत होती. हा पर्यायही आता खुला असणार आहे.
२) टोल फ्री क्रमांक हा दुसरा पर्याय होता. मात्र फोन उचलला जात नसल्यामुळे यावर पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करा लागत होता.
----
हे आहेत पर्याय..
१) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कृषी कार्यालयात करावेत.
२) शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज काढले आहे त्या बँकेतही पीक नुकसानीसंदर्भात अर्ज करता येतो.
३) पीक विमा कंपनीच्या तक्रार कार्यालयातही तक्रार करता येते.
४) त्याचबरोबर पीक विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.
५) पीक विमा कंपनीच्या ई-मेलवरही तक्रार नोंदविता येणार आहे.
६) पीक विमा कंपनीच्या अधिकृत ॲपवरही शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येते.
----
अतिवृष्टीचे पंचनामे सुरूच..
१) शेवगाव, पाथर्डी तालुक्यात अतिवृृष्टीमुळे बाधित क्षेत्र अधिक आहे. तसेच जिल्ह्यातील इतर भागातही बाधित क्षेत्राचे जिल्हा प्रशासन, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत.
२) नुकसान क्षेत्राचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती आहे हे लक्षात येणार आहे.
३) निकष न लावता सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
-----
१५ कपाशी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात अतिवृष्टीने कपाशीचे झालेले नुकसान.