शस्त्राचा धाक दाखवून दागिने लांबविले
By Admin | Published: October 29, 2016 12:08 AM2016-10-29T00:08:55+5:302016-10-29T00:39:37+5:30
कुकाणा : शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने, पाच हजार रोख असा सुमारे १ लाख ३७ हजाराचा ऐवज नेला.
कुकाणा : शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने, पाच हजार रोख असा सुमारे १ लाख ३७ हजाराचा ऐवज नेला. नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील काळे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
याबाबत निलेश दत्तात्रय काळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, मी व पत्नी विमल घराच्या वरील मजल्यावर झोपलो होतो. पाच ते सहा चोरट्यांनी घरासमोरील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. वरील मजल्यावर येऊन आमच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले. येथे त्यांच्या हाती काही न लागल्याने चोरटे आई कमल दत्तात्रय काळे, मुलगी प्रियंका,भावजय कुंदा रविंद्र काळे, पुतण्या विक्रम काळे, मुलगा वैभव हे ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीत चोरट्यांनी जाऊन त्यांना काठी, तलवार, कुऱ्हाड या शस्त्राचा धाक दाखविला व कपाटातील सामानाची उचकापाचक करून सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार घेऊन पोबारा केला.
कुकाणा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गर्जे यांनी पोलिसांसह परिसर पिंजून काढला. चोरट्यांनी फुल पॅण्ट, जर्किन व तोंडाला रूमाल बांधलेला होता तसेच ते हिंदी, मराठीतून बोलत होते, असे निलेश काळे यांनी सांगितले. पोलिसांनी उपलब्ध काही छायाचित्रे काळे कुटुंबीयांना दाखविली असता काही फोटो त्यांनी ओळखले. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली आहेत. चोरीच्या तपासासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजता श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी दुचाकीचा वापर केला असल्याचेही काळे यांनी सांगितले. पुढील तपास नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, सहाय्यक निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे करीत आहेत. चोरट्यांनी अंतरवाली येथील बाबासाहेब देशमुख यांच्या घरातूनही पाच हजार रुपये रोख व १५ हजार रुपये किमतीच्या कानातील रिंगा चोरून नेल्याचे समजले. (वार्ताहर)