पारनेरमध्ये सशस्त्र दरोडा; एकाचा पाय तोडला, चार जखमी, तीन लाखाचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:17 PM2017-10-26T14:17:40+5:302017-10-26T14:20:29+5:30
आनंद हा लघुशंकेसाठी पहाटेच्या सुमारास घराबाहेर आला असता दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी त्याचा पाठलाग करुन घरात प्रवेश केला. आनंद याला गज व दांडक्याने मारहाण करीत त्याच्या पायावर कु-हाडीने घाव घातला. यात त्याचा पाय तुटला.
पारनेर : पारनेर तालुक्यातील म्हसे येथील मदगे वस्तीवर सहाजणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात दरोडेखोरांनी कु-हाडीने एकाचा पाय तोडला तर चार जणांचा जबर मारहाण केली तसेच तीन लाखाचा ऐवज लांबविला.
बुधवारी (दि़ २५) पहाटे म्हसे येथील मदगे वस्तीवरील गणपत लक्ष्मण मदगे यांचे कुटुंबिय नेहमीप्रमाणे घरात झोपलेले होते. गणपत मदगे यांचा मुलगा आनंद हा लघुशंकेसाठी पहाटेच्या सुमारास घराबाहेर आला असता दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी त्याचा पाठलाग करुन घरात प्रवेश केला. आनंद याला गज व दांडक्याने मारहाण करीत त्याच्या पायावर कु-हाडीने घाव घातला. यात त्याचा पाय तुटला. त्याचवेळी दरोडेखोरानी शेजारच्या खोलीला बाहेरुन कडी लावली. त्यामुळे घरातील इतरांना घराबाहेर येता आले नाही. आनंदला मारहाण करुन त्याच्याकडून घरातील पन्नास हजार रुपये व गळ्यातील चैन काढून घेतली. आनंदकडून ऐवज काढून घेतल्यानंतर दरोडेखोरांनी शेजारच्या खोलीची बाहेरची कडी काढत गणपत मदगे यांना व त्यांची पत्नी, मुलगा या तिघांनाही मारहाण केली. तसेच यावेळी दरोडेखोरांनी विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. आरडाओरडा केल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली. पासष्ट वर्षाच्या वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने ओरबाडत बेदम मारहाण केली. मरणाच्या भीतीने घरातील सगळे गप्प बसले. त्यानंतर दरोडेखोरांनी घराबाहेर येत ओट्यावर मद्यप्राशन केले आणि पुन्हा घरात घुसून घरातील जेवणावर ताव मारला. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथूनच काही अंतरावर असलेल्या रमेश कोरेकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. कोरेकर यांच्या घरातील शेखर कोरेकर, त्यांच्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या सुमन चौधरी यांनाही मारहाण केली. तसेच चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटले. दोन वर्षांच्या चिमुकलीच्या कानातील दागिने कात्रीने कापून घेतले. सुमारे दोन तास मदगे वस्तीवर दरोडेखोरांचे हे थरारनाट्य सुरु होते. दरम्यान ही माहिती पोलिसांना समजली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत दरोडेखोरांनी तेथून धूम ठोकली.