सभापती पदासाठी सेना- काँग्रेसमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:47+5:302021-08-24T04:25:47+5:30
अहमदनगर : महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सभापतीपद सेना, तर ...
अहमदनगर : महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सभापतीपद सेना, तर उपसभापती पद काँग्रेसला देण्याबाबत चर्चा सुरू असून, महिला व बालकल्याण समितीच्या पुढच्या सभापती कोण, याचीच उत्सुकता आहे.
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सर्वसाधारण सभा झाली. महिला व बाल कल्याण समिती विसर्जित करण्याचा विषय सभेसमोर होता. सभेला आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी महिला व बाल कल्याण समितीचे विसर्जन करण्यास मान्यता देण्याची सूचना मांडली. त्यानुसार महापौर शेंडगे यांनी महिला व बालकल्याण समिती विसर्जित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावरून सभापती लता शेळके व उपसभापती सुवर्णा गेणप्पा यांच्यासह १६ सदस्यांची महिला व बालकल्याण समिती बरखास्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा सर्वसाधारण सभा बोलविली जाईल. सभा घेऊन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यानंतर सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे.
राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. नगर महापालिकेत सेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला महापालिकेत एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेसला महिला व बालकल्याण समिती देण्याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, सेनेकडून सभापती पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. सेनेला सभापती व उपसभापतीपद काँग्रेसला देण्याची चर्चा सुरू असून, काँग्रेसकडून रुपाली निखिल वारे व संध्या बाळासाहेब पवार यांची नावे चर्चेत आहेत. सेनेने सभापती पद घेतल्यास काँग्रेसला उपसभापती पदावर समाधान मानावे लागणार आहे.
.....
महिला व बालकल्याणला ५ टक्के निधी
महापालिकेच्या अंदाजपत्रकातील ५ टक्के रक्कम महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव असते. तसेच जिल्हा नियोजन समितीचा ५ टक्के निधी या समितीसाठी राखीव असतो. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून विकासकामे करणे शक्य आहे. तत्कालीन सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांच्या कार्यकाळात शहरातील उद्यानांमध्ये खेळणी बसविण्याचे मोठे काम झाले. तसेच अन्य विकासकामेही शिंदे यांनी समितीच्या माध्यमातून पूर्ण केली.