श्रीरामपुरातून सुगंधित गुटखा जप्त; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By शिवाजी पवार | Published: May 16, 2023 02:22 PM2023-05-16T14:22:18+5:302023-05-16T14:22:45+5:30
शहरातील संजयनगर भागामध्ये एका बंद घरात शोएब शेख हा खाण्यास अपायकारक असलेला सुगंधित गुटखा तयार करून त्याची चोरटी विक्री करीत होता.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यात विक्रीस बंदी असलेल्या सुगंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव शोएब अकबर शेख (वय २८, रा. संजयनगर) असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शहरातील संजयनगर भागामध्ये एका बंद घरात शोएब शेख हा खाण्यास अपायकारक असलेला सुगंधित गुटखा तयार करून त्याची चोरटी विक्री करीत होता.
पोलिसांना त्याबाबत माहिती मिळताच पंचासह पथक तेथे पाठवण्यात आले. त्यांनी कारवाईत ७८ हजार रुपये किमतीचा प्लास्टिक पिशवीत पॅक केलेला सुगंधित गुटखा जप्त केला. या गुटख्याचे प्रत्येकी पाच किलो वजनाचे पॅकिंग करण्यात आलेले होते. गुटखा तयार करण्यासाठी एक लाख रुपये किमतीची मशीन व इलेक्ट्रिक मोटर यावेळी मिळून आली. याशिवाय ५० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली.
जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ही कारवाई केली.