कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने क्षेत्र देवगड येथे सुमारे तीन लाख भाविकांकडून दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 04:00 PM2018-11-23T16:00:19+5:302018-11-23T16:00:24+5:30
नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे सलग दोन दिवस लागोपाठ आलेल्या कार्तिक व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.
नेवासा : नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे सलग दोन दिवस लागोपाठ आलेल्या कार्तिक व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेला दुपारी १२ वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींची महाआरती पार पडली.
या वर्षी सलग दोन पौर्णिमा गुरुवारी दि.२२ व शुक्रवारी २३ नोव्हेंबर रोजी आल्यामुळे गुरुवारी सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यात महिला भगिनींची गर्दी लक्षणीय होती. पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला.
सलग दोन दिवस आलेल्या त्रिपुरारी व कार्तिक पौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी त्रिपुरारी वाती प्रज्वलीत करून विधीवत पूजन केले. तसेच गंगास्नान करून प्रवरामाईला दिवे अर्पण केले. सर्वाना कार्तिक स्वामींना अभिषेक घालता यावा. म्हणून मंदिर प्रांगणात मंडपाची उभारणी करून चांदीच्या मूर्तीस अभिषेक घालण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्तिक पौर्णिमेला देवगड प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. भगवान दत्तात्रय व कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी दर्शन बारी लागली होती. दुपारी १२ वाजता झालेल्या महाआरतीला गर्दीने उच्चांक केला होता. गंगापूर तालुक्यातील कनकोरी, गळनिंब, जामगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामी, पंचमुखी सिद्धेश्वर, श्री समर्थ किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्तिक पौर्णिमेला देवगडला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.