महापालिकेकडून ५७० बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:15+5:302021-04-01T04:22:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नव्याने दोन कोविड केअर सेंटर बुधवारी सुरू करण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नव्याने दोन कोविड केअर सेंटर बुधवारी सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत ५७० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रत्येक सेंटरमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आयुक्त शंकर गोरे म्हणाले, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दोन्ही उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. मार्च महिना असल्याने कर्मचारी वसुलीत व्यस्त होते. मार्च महिना संपल्याने उद्या १ एप्रिलपासून हे कर्मचारी कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी काम करतील. कामाच्या विभागणीबाबत बुधवारी सायंकाळी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेडची आवश्यकता पडणार आहे. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन व डॉनबास्को येथे नव्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग येथेही सेेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी ५७० खाटांची सोय करण्यात आली आहे. बेडची संख्या आणखी वाढविण्यात येईल. महापालिका यापुढे कुणालाही कोविड केअर सेंटर चालविण्यास देणार नाही. महापालिका स्वत: आवश्यकतेनुसार बेडची सोय करणार असून, त्यासाठी लागणारा सर्व खर्च महापालिकाच करणार आहे, असे गोरे म्हणाले. शहरात ज्या भागात रुग्ण आढळून येतील, त्या भागात पूर्वीप्रमाणेच कन्टेन्मेंट केले जाणार आहेत. छोटे कन्टेन्मेंट न करता मोठा परिसर कन्टेन्मेंट केला जाईल. कन्टेन्मेंट केलेल्या भागात सशुल्क सेवा पुरविली जाईल. त्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नियोजन केले जाणार असून, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महापालिकेकडून आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. नागरिकांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन गोरे यांनी केले.
.....
ठळक कार्यवाही.........
कोविड केअर सेंटरमध्ये ५ टक्के बेड ऑक्सिजनचे
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी कर्मचाऱ्यांची फौज
तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी खाटा राखीव करणार
शहरातील १,७०० रुग्ण होम क्वॉरंटाइन
...
असे आहेत बेड
नटराज-१५०,
जैन पितळे बोर्डींग-७०,
शासकीय तंत्र निकेतन-१५०,
डॉन बास्को-६०,
बुथ हॉस्पीटल-१६०