कोविड सेंटरमध्ये जनरेटरची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:22 AM2021-04-28T04:22:07+5:302021-04-28T04:22:07+5:30
संपूर्ण जिल्ह्यातील रुग्ण सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भयभीत आहेत. त्यातच या उन्हामुळे जीव गुदमरण्याची वेळ येते, मात्र जिल्ह्यातील बहुतांश कोविड ...
संपूर्ण जिल्ह्यातील रुग्ण सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भयभीत आहेत. त्यातच या उन्हामुळे जीव गुदमरण्याची वेळ येते, मात्र जिल्ह्यातील बहुतांश कोविड सेंटर हे चांगल्या दर्जाच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये अथवा काही खासगी महाविद्यालयांच्या इमारतींत कोविड सेंटर्स कार्यान्वित आहेत. यातील काही तालुक्यांच्या इमारती या नव्या चकचकीत आहेत. आधुनिक पद्धतीने या इमारतींचे बांधकाम केलेले असल्यामुळे येथे नैसर्गिकरीत्याच हवा खेळती राहाते. दुमजली व तीनमजली इमारतींमध्ये तितकासा उकाडा जाणवत नाही. त्यातच पंख्यांची व जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे.
-------------
उकाड्याचा त्रास नाही
श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील कोविड सेंटरमध्ये मी भरती होतो. मात्र तेथे व्हेंटिलेशनची खूप चांगली व्यवस्था आहे. २४ तास वीजपुरवठा आहे. इमारतीत पंखे आहेत. त्यामुळे उकाड्याचा त्रास जाणवला नाही.
- प्रसाद लढ्ढा,
रुग्ण, बेलापूर
----------
एप्रिल तापला
जिल्ह्यात दुपारच्या वेळी पारा ४० अंशावर गेला आहे. मार्चमध्ये पारा ३६ अंशाच्या खाली होता. आणखी पंधरा दिवस तापमानातील ही वाढ कायम राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे. मे महिन्याच्या अखेरीस मात्र उन्हाचा चटका कमी होईल. त्यानंतर नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे.
----------
विजेची तूट नाही
लॉकडाऊनमुळे बहुतांशी विजेचा व्यावसायिक वापर घटला आहे. उन्हाळ्यात शेतीसाठी विजेची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत नाहीत. परिणामी पंखे व कूलरची सेवा रुग्णांना अखंडपणे मिळत आहे.
--------