महावितरणकडे थकबाकी, गाव करणार कार्यालय 'सील'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:44 PM2021-03-24T16:44:50+5:302021-03-24T16:46:01+5:30
थकबाकी ३१ मार्च पर्यंत न भरल्यास महावितरण कंपनीचे कार्यालय 'सील' करण्याचा निर्णय आज (दि २२) रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.
केडगाव : विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे असलेली थकबाकी ३१ मार्च पर्यंत न भरल्यास महावितरण कंपनीचे कार्यालय 'सील' करण्याचा निर्णय आज (दि २२) रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.
जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे ग्रामपंचायतची पाणीपट्टी व कर मिळवून सुमारे १ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे सहा वर्षापासून असल्याकारणाने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये मार्च अखेरीस थकबाकी जमा न झाल्यास जेऊर येथील महावितरण कंपनीचे कार्यालय सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आठवड्यात महावितरण कंपनीने ग्रामपंचायतकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीसाठी ग्रामपंचायतचे वीज जोड तोडले होते. विजजोड तोडण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्यही आक्रमक होत महावितरण कंपनीला थकबाकी भरण्याबाबत नोटीस काढली आहे. नोटीसमध्ये थकबाकी जमा न केल्यास कार्यालय सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
.........
ग्रामपंचायतकडे असलेल्या वीज बिलाची वजावट करून उर्वरित ग्रामपंचायतचा कर व पाणीपट्टी महावितरण कंपनीकडून नियमीत पणे भरण्यात येणार आहे.
- किसन कोपनर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी