राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे १२८ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 AM2021-02-27T04:26:58+5:302021-02-27T04:26:58+5:30
महावितरणने थकबाकी वसूल व्हावी म्हणून रोहित्राचा वीजपुरवठा सरसकट बंद केला आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे बंधनकारक आहे. ...
महावितरणने थकबाकी वसूल व्हावी म्हणून रोहित्राचा वीजपुरवठा सरसकट बंद केला आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे बंधनकारक आहे. दोन ते तीन शेतकऱ्यांनी जरी वीज बिल भरले नाही तरी सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद होत आहे. त्वरित वीज बिल वसुली व्हावी म्हणून महाराष्ट्र विद्युत महामंडळाने फास आवळला असून शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.
शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होत आहे. त्यातच रोहित्र बंद करण्याच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. अनेक शेतकऱ्यांवर कर्ज झालेले आहे, अशा परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आत्तापर्यंत ४ कोटी २५ लाख वीज बिल शेतकऱ्यांनी भरले आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या शेतकऱ्यांनी शासकीय कृषी पंप योजनेच्या फायदा घेत वीज बिल भरण्याचे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना नोटिसा देऊनच वीजपुरवठा खंडित करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
.........
थकीत वीज बिलापोटी शेतकरी विजेचा भरणा करीत आहेत. शेतकऱ्यांना घरपोच बिले देण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून वीज बिल वसुलीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
- धीरज गायकवाड,
अभियंता, महावितरण
....
कांदा व गहू या पिकांचे शेवटचे दोन ते तीन पाणी बाकी आहेत. त्यातच जर वीजपुरवठा खंडित झाला तर हातातोंडाशी आलेला घास या सरकारने हिरावून घेण्याचे काम सुरू केले आहे. आम्हांला जर वेळच्यावेळी बिले दिली असती तर आम्ही ती भरली असती. एवढी मोठी रक्कम आणायची तरी कुठून?
- अजित पटारे, शेतकरी