अहमदनगर जिल्ह्यातील तेराशे गुन्हेगार पोलिसांच्या नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:47 PM2018-02-07T13:47:03+5:302018-02-07T13:47:23+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली असून, १ हजार ३५३ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांच्या हालचालींवर आता पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली असून, १ हजार ३५३ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांच्या हालचालींवर आता पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. जिल्ह्यातील भुरटे, सराईत आणि कुख्यात गुन्हेगारांची पोलीस ठाणेनिहाय अधिकारी, कर्मचा-यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा आणि गुन्हेगारीच्या घटनांत संवेदनशील जिल्हा म्हणून नगरची राज्यात ओळख आहे. विविध गुन्ह्यांत रेकॉर्डवर आलेले, शिक्षा भोगून आलेले, तर जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा गुन्हे करण्यात सक्रिय होतात. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशातून गुन्हेगारी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यातील आणि बाहेरून येऊन गुन्हे करणा-यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील ३० पोलीस ठाण्यांतील ६१९ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांवर या गुन्हेगारांची जबाबदारी देण्यात आली आहे. नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, कॅम्प या तीन पोलिस स्टेशनमधील ६० गुन्हेगार दत्तक घेतले असून, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुकुंदनगर परिसरातील एका कुख्यात टोळीतील सदस्यांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.
या गुन्हेगारांचा समावेश
दुचाकी, चारचाकी वाहने चोरणा-या टोळ्या, चैनस्रॅचिंग करणारे, दरोडेखोर, रस्तालूट करणारे, मारहाण, खून, दरोडे टाकणारे यासह कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचविणा-या गुन्हेगारांचा या योजनेत समावेश आहे.
काय करणार पोलीस
ज्या गुन्हेगारांची संबंधित पोलीस अधिका-याकडे जबाबदारी आहे, तो अधिकारी गुन्हेगाराच्या हालचालींवर लक्ष्य ठेवणे, त्याच्या घरी अचानक भेट देणे, त्याला पोलीस ठाण्यात हजेरीसाठी बोलविणे, त्याच्या संपर्कात इतर कोणी गुन्हेगार आहेत का, याकडे लक्ष्य ठेवणे, त्या गुन्हेगाराने काही गुन्हा केला तर तत्काळ त्याला अटक करणे, अशी जबाबदारी आहे.
एलसीबीकडे सराईत गुन्हेगार
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह या शाखेतील ४२ अधिकारी, कर्मचा-यांकडे २१२ गुन्हेगारांची जबाबदारी आहे. पवार यांच्याकडे चाच्या पाच्या भोसले, अजहर मंजूर शेख, पवन युनूस काळे, रघुल दशरथ काळे, रमेश छगन भोसले यांची जबाबदारी आहे.
पोलीस स्टेशननिहाय दत्तक गुन्हेगार
कोतवाली - २०, तोफखाना - २०, कॅम्प - २०, एमआयडीसी - १५, नगर तालुका - ३०, सुपा - २०, पारनेर - १२८, बेलवंडी - १९, श्रीगोंदा - २०, कर्जत - २०, जामखेड - ११, पाथर्डी - २६, शेवगाव - ३१, नेवासा - २२, सोनई - ३२, शनिशिंगणापूर - ३२, श्रीरामपूर शहर - ५०, श्रीरामपूर तालुका - १११, राहुरी - २०, राहाता - २१, लोणी - १५, शिर्डी - २५, कोपरगाव शहर - ८५, कोपरगाव तालुका - १५, संगमनेर शहर - २०५, संगमनेर तालुका - ७५, घारगाव - १५, आश्वी - २२, अकोले - १४, राजूर - १५, स्थानिक गुन्हे शाखा - २१२.