टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला फसविणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:56+5:302021-03-31T04:20:56+5:30
दादा ऊर्फ शशिकांत मारुती सातपुते (रा. भोयरे गांगर्डा, ता.पारनेर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २ ...
दादा ऊर्फ शशिकांत मारुती सातपुते (रा. भोयरे गांगर्डा, ता.पारनेर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २ कोटी ६९ लाख रुपये किमतीच्या १६ आलिशान कार जप्त केल्या आहेत.
महेश प्रताप खोबरे यांची पुण्याजवळील पिसोळ येथे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. सातपुते याने खोबरे यांच्या कंपनीकडून महाबली इंटरप्राइजेस या नावाने २२ आलिशान इनोव्हा, क्रेस्टा, बीएमडब्ल्यू, स्कॉर्पिओ या गाड्या भाड्याने घेतल्या. काही दिवसांनंतर यातील ९ कार आरोपीने कंपनीला परत केल्या, उर्वरित १३ कार व त्यांचे भाडे परत न करता त्या परस्पर इतर लोकांकडे गहाण ठेवल्या. याबाबत कंपनीच्या संचालकाने सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपी सातपुते याला जेरबंद करून त्याच्याकडील १६ कार जप्त केल्या. दरम्यान, सातपुते याच्याकडे असलेल्या कारमधील एक कार ही खंडणीच्या गुन्ह्यातही वापरल्याचे समोर आले असून, पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस नाईक सुरेश माळी, रवीकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, मयूर गायकवाड, रोहित येमुल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.