घरोघरी गणरायांचे उत्साहात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:28+5:302021-09-11T04:22:28+5:30
कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मरगळ आलेल्या बाजारपेठेला गणेशोत्सवानिमित्त नवसंजीवनी मिळाली आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य व इतर खरेदीसाठी गेल्या आठ ...
कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मरगळ आलेल्या बाजारपेठेला गणेशोत्सवानिमित्त नवसंजीवनी मिळाली आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य व इतर खरेदीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बाजारात गर्दी होत आहे. शुक्रवारी दिवसभर व शनिवारी सायंकाळपर्यंत शहरातील कल्याण रोड, झोपडी कॅन्टीन परिसर, पाइपलाइन रोड, प्रोफेसर चौक, माळीवाडा, चांदनी चौक आदी ठिकाणी मूर्ती व इतर साहित्य खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत ग्राहक आणि विक्रेत्यांनी मात्र कोरोनाच्या नियमांना बाजूला सावरून मुक्तसंचार केलेला दिसला.
--------------
शाडूमातीच्या मूर्तींना मोठी मागणी
कोरोना सावटामुळे मागील वर्षांपासून बहुतांशी जण घरीच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास पसंती देत आहेत. पीओपीच्या तुलनेत शाडूमातीची मूर्ती पाण्यात लवकरच एक ते दीड तासात पूर्णपणे विरघळून जाते, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीनेही मातीची मूर्ती योग्य असल्याने यंदा बहुतांशी भाविकांनी याच मूर्तींना पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. भाविकांनी ३०० रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत मातीच्या मूर्ती खरेदी केल्या.
-------------------------
सार्वजनिक ठिकाणीही श्रींची प्रतिष्ठापना
नगर शहरासह जिल्ह्यात नेहमीप्रमाणे गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. कोरोनाच्या सावटामुळे बहुतांशी मंडळांनी साध्या पद्धतीनेच प्रतिष्ठापना केली, तसेच आरस व इतर कार्यक्रम यंदा होणार नाहीत. काही मंडळांनी उत्सव काळात गर्दी होणार नाही, असे सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत.
-----------------
दर्शनासाठी गर्दी करू नका
कोरोनाचे सावट कायम असल्याने मंदिर अथवा मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भाविकांना दर्शन उपलब्ध करून द्यावे, सार्वजनिक अथवा खासगी मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढू नये, कोरोनासंदर्भात लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
----------------------
पोलीस बंदोबस्त तैनात
अपर पोलीस अधीक्षक - २
पोलीस उपअधीक्षक - ९
पोलीस निरीक्षक - ३२
सहायक निरीक्षक - १०२
पोलीस अंमलदार - २२५०
आरसीपी प्लाटून - ०३
एसआरपीएफ - १ कंपनी
होमगार्ड - १०००