अनेक गावात अजूनही ‘अर्सेनिक’ पोहोचेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:01+5:302021-01-25T04:21:01+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे ग्रामस्थांना वाटण्यात येणाऱ्या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे नियोजन बिघडल्याने ...
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे ग्रामस्थांना वाटण्यात येणाऱ्या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे नियोजन बिघडल्याने अद्यापही या गोळ्या अनेक ग्रामस्थांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत.
कोरोनाच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्याचे आदेश शासनाने जून २०२० मध्ये काढले होते. या गोळ्या वाटपाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे देण्यात आली. परंतु या गोळ्या खरेदीची प्रक्रिया तब्बल पाच महिने उशिरा म्हणजे नोव्हेंबरमध्ये झाली. डिसेंबरमध्ये पुरवठादाराने या गोळ्या प्रत्येक पंचायत समितीला पोहोच केल्या. परंतु पंचायत समितीमध्येही या गोळ्या अनेक दिवस पडून होत्या. याबाबत ओरड झाल्यानंतर या गोळ्यांचे ग्रामपंचायतींना वितरण झाले. परंतु अजूनही अनेक ग्रामपंचायतींकडून या गोळ्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचविलेल्या नाहीत.
शेवगाव तालुक्यात या गोळ्यांमध्ये पाणी आढळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी या गोळ्यांकडे पाठ फिरवली. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आल्याने गोळ्यांचे वाटप आणखी लांबले. गोळ्या लोकांपर्यंत गेल्या की नाही याबाबत लोकमतने काही ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेतली तर अनेक गावात या गोळ्या आल्या नसल्याचे सांगण्यात आले.
------------
या गोळ्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच कोविडसाठी उपयुक्त आहेत. परंतु आरोग्य विभागाकडून किंवा ग्रामपंचायतींकडून आम्हाला अद्याप या गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले नाही.
- रमेश राजगुरु, ग्रामस्थ पाचेगाव, ता. नेवासा
-------------
अद्याप अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या मिळाल्या नाहीत. या गोळ्या कशासाठी आहेत किंवा कधी मिळणार हेही कोणी सांगितलेले नाही.
- सुनील धुमाळ, खरवंडी, ता. नेवासा
--------------
वळण ग्रामपंचायतीला ३४०० गोळ्या आल्या आहेत. गोळ्यांचे वाटप हे अंगणवाडी सेविका, आरोग्य सहाय्यक सेविका यांच्यामार्फत कुटुंबापर्यंत पोहोचविल्या जात आहेत.
- संतोष राठोड, ग्रामसेवक वळण, ता. राहुरी
------------------
आमच्या भागात अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप झालेले नाही. आमच्याकडे अजून कुणीही फिरकले नाही. आम्हाला त्याबाबत फारशी माहितीही नाही.
- शिवाजी गंधारे, नवे पुनतगाव, ता. नेवासा
---------------------------------------------------
भेंडा परिसरात अद्याप कुठल्याही प्रकारच्या गोळ्यांचे वाटप झाले नाही. नेमके कोण वाटप करणार आहे हे सुद्धा माहीत नाही.
- पांडुरंग आरगडे, भेंडा. ता. नेवासा
-------------
राहाता तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायतमार्फत कोरोनाच्या सुरूवातीलाच गावातील सतरा हजार कुटुंबाला सलग तीन महिन्याचा अर्सेनिक गोळ्यांचा कोर्स मोफत केला. ग्रामपंचायतीने हे वाटप पदर खर्चाने केले. त्यामुळे आता परत गावकऱ्यांना गोळ्यांचा डोस देणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गोळ्या घेतलेल्या नाहीत.
- डॉ. धनंजय धनवटे, सरपंच पुणतांबा
----------
पठार भागात गोळ्या नाहीत
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा, अकलापूर, खंदरमाळवाडी, साकुर, वनकुटे आदी गावांच्या वाड्यावस्त्यांवर ठिकठिकाणी अर्सेनिक गोळ्या अद्याप मिळाल्या नाहीत.
-------------
३८ लाख ग्रामस्थांना गोळ्या
मनपा, नगरपालिका असा शहरी भाग वगळता जिल्ह्यातील सर्व गावात म्हणेज ३८ लाख ४१ हजार लोकांना प्रत्येक एक डबी याप्रमाणे गोळ्यांचे वाटप होणार आहे. एका डबीत ५० गोळ्या असून दोन महिन्यांचा हा कोर्स आहे. १ कोटी ४८ लाख रूपयांच्या गोळ्या खरेदीच्या निविदा काढल्यानंतर पुण्यातील एका फार्मसी कंपनीला गोळ्या पुरवठा करण्याचे काम देण्यात आले.