जीवन जगण्याची कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:29 PM2019-12-07T12:29:58+5:302019-12-07T12:30:47+5:30
पूर्णवाद जगासमोर येतांना तत्वज्ञान म्हणून आले तरी पूर्णवाद म्हणजे जीवन जगण्याची कला सांगणारे आधुनिक शास्त्र आहे. कुठल्याही शास्त्रात एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी गृहित धरल्या जातात व एखादा फॉर्म्युला अप्लाय करुन सिद्ध करावयाची गोष्ट अंतिमत: मिळते. पूर्णवाद हे अधुनिक शास्त्र असल्यामुळे आजवर ज्या प्राप्त जीवनाचा विचार केला जात नव्हता, त्याचे मोल न ओळखता त्याची हेळसांड केली जायची.
पूर्णवाद जगासमोर येतांना तत्वज्ञान म्हणून आले तरी पूर्णवाद म्हणजे जीवन जगण्याची कला सांगणारे आधुनिक शास्त्र आहे. कुठल्याही शास्त्रात एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी गृहित धरल्या जातात व एखादा फॉर्म्युला अप्लाय करुन सिद्ध करावयाची गोष्ट अंतिमत: मिळते. पूर्णवाद हे अधुनिक शास्त्र असल्यामुळे आजवर ज्या प्राप्त जीवनाचा विचार केला जात नव्हता, त्याचे मोल न ओळखता त्याची हेळसांड केली जायची. मोक्ष प्राप्तीची किंवा ईश्वर प्राप्तीची वाट अशीच असते या समजुतीने वागले जात होते. आचरण होत होते. जीवनाचे महत्व ओळखून व त्याचे मोल जाणून वागण्यास ज्या तत्वज्ञानाने सांगितले ते म्हणजे पूर्णवाद. मनासारखे जगून समाधान प्राप्त होईल आणि जीवनातले समाधान ईश्वर कृपेची अनुभुती दाखवेल. ईश्वर कृपेची अनुभुती घेत घेतच जीवनानंद,पूणानंद प्राप्त होईल आणि हाच मोक्ष आहे, हे सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे पूर्णवाद आहे.
पूर्ण म्हणजे ज्यात काही त्रुटी नाही. वाद म्हणजे दर्शन. ज्या ग्रंथाच्या दर्शनाने-अभ्यासाने त्या पूर्णपुरुषाचे पूर्ण स्वरूपाचे ज्ञान होते असा ग्रंथ, मनासारखे जीवन जगता यावे, यासाठी मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे पूर्णवाद. मानवी जीवन प्रभूत्वाने समाधानाने जगण्यासाठी स्वरूप- संबंधाची विचारांची रीत शिकवणारे शास्त्र म्हणजे पूर्ण वाद. प्रपंच आणि परमार्थाचा सुवर्णमध्य साधण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे पूर्णवाद. कालच्या दिवसाचा संबंध आजच्या दिवसाशी आणि आजच्या दिवसाचा संबंध उद्याशी लावत जीवनाची कला आत्मत्सात करत, प्रभुत्वाने आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याचे शास्त्र म्हणजे पूर्णवाद आहे.
शरीर, मन आणि बुद्धी यांची ज्ञान, कर्म व उपासना याद्वारे ओळख करून देणारा पूर्णवाद. जीवनाच्या अनुषंगाने ईश्वराचा विचार म्हणजे पूर्णवाद. वैश्विक एकात्मता बंधुभाव संवर्धित करणारे तत्वज्ञान म्हणजे पूर्णवाद ! सभ्यतेला अनुरुप सदृढ, प्रवाही संस्कृती निर्माण करुन मानवी जीवनाला प्रगतीपथा कडे नेण्याचे अविरत कार्य करणारी विचार आचार धारा म्हणजे पूर्णवाद! जीवन संकल्पाने जगण्याची शिकवण देतो तो पूर्णवाद! नैपुण्य, योजकता, लोकमत, लोकसंग्रह, कालज्ञान यांना प्रयत्नपुर्वक अंगीबाणवून उपासनेने देवकृपेद्वारा यश संपादन करुन देणारा विचार म्हणजे पूर्णवाद. जड चेतनात अभेद प्रतिपादन करुन ते सिद्ध करणारा विचार म्हणजे पूर्णवाद. विचाराला आचारात परीणत करुन यशस्वी होण्याचा राजमार्ग म्हणजे पूर्णवाद. माणसाची मुलभुत प्रेरणा जगावे व मनासारखे जगावे याची जाणीव करुन त्याच्या परीपुर्ती चा मार्ग सांगणारा विचार म्हणजे पूर्णवाद. सर्व वादांना पूर्णत्व देणारा वाद म्हणजे पूर्णवाद. पूर्णवाद म्हणजे जीवनवाद. एकटे ज्ञान, एकटी भक्ती(उपासना)असे करुन भागत नाही, तर ज्ञान, कर्म, उपासना तिन्हीचा संगम म्हणजे पूर्णवाद! सकल मानवजातीच्या कल्याणासाठी संकल्पाने जीवन जगून ऐच्छिक जीवनलाभ प्राप्त करणे याचे नाव पूर्णवाद. देव आणि गुरु या विधायक शक्तिवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने मार्ग काढणे म्हणजे पूर्णवाद होय. पूर्णवादात सर्व विचारधारांचे संकलन आहे. तत्वज्ञानाचा वास्तव जीवनात वापर कसा करायचा हे शिकवणारी सर्वात सोपी पद्धत म्हणजे पूर्णवाद आहे.
जीवनात समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला पुरुन उरण्यासाठी व्यक्तीला पात्र करणारे तत्त्वज्ज्ञान म्हणजे पूर्णवाद आणि जी व्यक्ती सुख दु:खादी प्रसंगाना पूरून उरते ती पूर्णवादी. भौतिकवादी केवळ देहावर भर देतात तर अध्यात्मवादी केवळ आत्म्यावर भर देतात आणि दोघेही जीवनसापेक्षता डावलतात - विसरतात. प्रत्येक प्रश्न जीवनसापेक्षच आहे. कारण तो मानवी जीवनातूनच आला-निर्माण झालेला आहे व तो तसा आहे, म्हणून माणसाने माणसाच्या जीवन हेतूतूनच तो सोडवला पाहिजे.
-पारनेरकर महाराज यांच्या ग्रंथ संग्रहातून