कष्टाचं फळ मिळालं
By Admin | Published: September 5, 2014 11:45 PM2014-09-05T23:45:32+5:302023-06-26T11:44:34+5:30
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर कष्टाचं फळ मिळाल्याचे समाधान वाटत आहे़ अशी भावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते प्रकाश गरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़
अहमदनगर : शिक्षण क्षेत्रात गेली ४५ वर्षे अविरत सेवा केली़ फक्त विद्यार्थी हेच ध्येय आणि तेच विश्व समोर ठेवून काम केले़ शालेय जीवन हाच विद्यार्थ्यांचा पाया असतो़ हा पाया भक्कम करण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविले़ आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर कष्टाचं फळ मिळाल्याचे समाधान वाटत आहे़ अशी भावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते प्रकाश गरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़
पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे अतिशय गरीब कुटुंबात माझा जन्म झाला़ वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले़ मनात मात्र, शिक्षण घेवून मोठे व्हावे, अशी जिद्द लहानपणापासून होती़ अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले़ ईचरचबाई फिरोदिया विद्यालयात शिक्षकाची नोकरी मिळाली़ शिक्षक म्हणून काम करीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांत मी स्वत:ला पाहू लागलो़ प्रत्येक विद्यार्थी घडावा, त्याचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा हेच ध्येय समोर ठेवले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाला सुरुवात केली़ विद्यालयाचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले़ आज तेच विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत याचे मोठे समाधान आहे़ ४५ वर्षांच्या सेवेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला़ यामध्ये शिक्षण संस्था, सहकारी शिक्षक व गुरुजनांच्या शुभेच्छा व सहकार्य असल्याचे गरड म्हणाले़
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या देशातील ३५१ शिक्षकांशी गुरुवारी रात्री नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी सुमारे एक तास दिलखुलास संवाद साधला़
शालेय जीवनातच मुलांचा पाया पक्का झाला तर भविष्यात तो विद्यार्थी नक्कीच प्रगती करतो़ असे सांगत मुलांना घडविण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत, अशी विचारणा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक शिक्षकांना केली़
घरात आई जसे मुलांवर संस्कार करते तसे विद्यालयात शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात़ विद्यार्थ्यांच्या जीवनात आईइतकेच शिक्षकांचेही महत्त्व असल्याचे यावेळी गरड म्हणाले़