चित्रकाराच्या बोलक्या चित्रांनी वेधले लक्ष; वृक्षांसह पाषाणही करतात कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:29 AM2020-06-09T11:29:43+5:302020-06-09T11:30:47+5:30
वृक्षांसह दगड, पाषाणावर कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेश रेखाटण्याचे काम नेवासा येथील चित्रकार भरतकुमार उदावंत हे गेल्या ७१ दिवसांपासून करत आहेत. त्यांनी शहरासह तालुक्यातील अनेक गावात हा उपक्रम राबविला आहे.
सुहास पठाडे /सतीश उदावंत ।
नेवासा : वृक्षांसह दगड, पाषाणावर कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेश रेखाटण्याचे काम नेवासा येथील चित्रकार भरतकुमार उदावंत हे गेल्या ७१ दिवसांपासून करत आहेत. त्यांनी शहरासह तालुक्यातील अनेक गावात हा उपक्रम राबविला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच वात्रटिका, कविता, विनोदी व्यंगचित्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी, हिंदी लेखनातून प्रबोधनाचे काम भरतकुमार उदावंत करीत आहेत. त्यांनी मागील ७० दिवसात दीडशेहून अधिक चित्र, शंभरहून अधिक कवितांच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे.
शहरी भागातून ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत आहे. त्यातच त्यावर उपाय नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देणे हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृतीचे कामही गतिमान करण्यासाठी रस्त्याच्या बाजूची झाडे, दगड, पाषाण, भिंती यावर प्रबोधनपर चित्र रेखाटण्याची कल्पना उदावंत यांना सुचली. त्यांनी कोरोना जनजागृती संदेश दगड, झाडे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला.
कोरोना देशातून हद्दपार करायचाय, कोरोनाला हरवायचेय, मास्कचा वापर करा, वारंवार स्वच्छ हात धुवा, गर्दी टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, घरीच रहा सुरक्षित रहा असे संदेश त्यांनी नेवासा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी रेखाटले आहेत.यापूर्वी त्यांनी व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, स्वाईन फ्लू, ग्रामस्वच्छता अभियान, मतदान हे कर्तव्य आदीबाबत जनजागृती केली आहे.
चित्र आणि कविता हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी कोरोनाच्या लढाईत झाडे-दगडांवर चित्र काढून जनतेचे लक्ष वेधले. त्यामुळे कोरोना जनजागृतीमध्ये प्रशासनाला मोठी मदत झाली. तेही कोरोना योद्धेच आहेत.
-रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासा.
समाजहितासाठी जनजागृतीचे काम चित्रांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून करत आहे. कोरोनासारख्या महामारीपासून जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी मागील ७१ दिवसांपासून विविध माध्यमातून जनजागृतीचे काम करीत आहे.
-भरतकुमार उदावंत, चित्रकार