एसटी बस रस्त्याकडेच्या चारीत, प्रवासी किरकोळ जखमी; नगर-जामखेड मार्गावरील घटना
By चंद्रकांत शेळके | Published: September 11, 2023 12:02 PM2023-09-11T12:02:58+5:302023-09-11T12:03:31+5:30
आष्टी आगाराची जामखेड-पुणे ही बस सोमवारी पुण्याकडे निघाली होती.
अहमदनगर : स्टेअरिंग फ्री झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याकडेच्या चारीत गेली. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलजवळ नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली.
आष्टी आगाराची जामखेड-पुणे ही बस सोमवारी पुण्याकडे निघाली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास चिचोंडी पाटीलच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर आली असता बसचे स्टेअरिंग फ्री झाले. त्यामुळे बस आहे त्याच दिशेने जाऊ लागली. चालकाला ब्रेक लावेपर्यंत बस उजवीकडे असलेल्या चारीत गेली. बसमध्ये विद्यार्थ्यांसह ४० ते ५० प्रवासी होते.
चारीत गेल्याने बस अचानक कोलमडली. यात बसच्या पुढील काचाही फुटल्या. प्रवासी एकमेकांवर, तसेच बाकावर आदळल्याने किरकोळ जखमी झाले. जखमी प्रवाशांना तातडीने चिचोंडी पाटील येथीलच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.