कावळे रुसले...दशक्रिया विधी थांबले; श्रीगोंद्यात नेमकं काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 10:49 AM2022-03-05T10:49:36+5:302022-03-05T10:49:52+5:30

श्रीगोंदा शहरातील मयतांचे दशक्रिया विधी हे आता सिद्धटेक व इतरत्र केले जात आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, दशक्रिया विधीला जाणे हे परवडण्यासारखे नाही.

As there were no crows, the Dashakriya ritual stopped at Shrigonda in Ahmednagar | कावळे रुसले...दशक्रिया विधी थांबले; श्रीगोंद्यात नेमकं काय घडले?

कावळे रुसले...दशक्रिया विधी थांबले; श्रीगोंद्यात नेमकं काय घडले?

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा येथील सरस्वती नदीवरील दशक्रिया विधी घाट श्रीगोंदा नगरपालिकेने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बांधला. मात्र दीड वर्षांपासून दशक्रिया विधीकडे कावळ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे दशक्रिया विधी घाट ओस पडला आहे.

श्रीगोंदा शहरातील मयतांचे दशक्रिया विधी हे आता सिद्धटेक व इतरत्र केले जात आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, दशक्रिया विधीला जाणे हे परवडण्यासारखे नाही. त्यात गरीब कुटुंबांना बाहेरच्या ठिकाणी जाऊन असे विधी करणे आवाक्याबाहेर असते. यामुळेच संभाजी ब्रिगेड, अरविंद कापसे यांच्या संकल्पनेतून खंडोबा मंदिरासमोर सरस्वती नदीच्या तिरावर २५ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सलग पाच दिवस दशक्रिया विधी पूजेचा प्रयोग करण्यात आला. तेथे पाच पैकी तीन वेळा काकस्पर्श झाला. त्यामुळे आता काय करायचे? असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. कावळा शिवत नाही म्हणून आपण मृत्यू पावलेल्या माणसाला मोक्ष मिळाला नाही, असे समजले जाते. म्हणून काकस्पर्शासाठी आता श्रीगोंद्यातील घाटावर विधी नकोच, अशी मानसिकता झाली आहे.

पाच दशक्रिया करण्याच्या प्रयोगासाठी पुजारी मोहोळकर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे, दिलीप लबडे, अरविंद कापसे, राजेंद्र राऊत, सुनील ढवळे, ॲड. गोरख कडूस, दत्ताजी जगताप, सागर हिरडे, भाऊसाहेब खेतमाळीस, गणेश पारे, मयूर आढाव, प्रवीण धुमाळ, वैभव हिरडे, सूरज शिंदे, गणेश ससाणे यांनी या उपक्रमात भाग घेतला.

श्रीगोंदा शहरात हॉटेलची संख्या वाढली आहे. हॉटेलमधील शिल्लक अन्न उघड्यावर मोठ्या प्रमाणात टाकलेले असते. त्यामुळे पक्षांना सहज पद्धतीने आहार उपलब्ध होतो. तसेच दशक्रिया घाटावर झाडांची संख्या कमी आहे. या दोन कारणांमुळे दशक्रिया विधी घाटाकडे येणाऱ्या कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. घाट परिसरात वृक्षारोपण होणेही गरजेचे आहे. -दत्ता जगताप, दक्ष फौंडेशन, श्रीगोंदा

 

Web Title: As there were no crows, the Dashakriya ritual stopped at Shrigonda in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.