आश्रमशाळेत शिकून वडीलांचे स्वप्न पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:04 PM2018-06-14T18:04:48+5:302018-06-14T18:05:17+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विकास परशुराम धोत्रे या विद्यार्थ्याने परिस्थितीवर मात करत आश्रमशाळेत शिकून ९३ .२० टक्के गुण मिळवुन वडीलांचं स्वप्न साकार केलं.
संदीप घावटे
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विकास परशुराम धोत्रे या विद्यार्थ्याने परिस्थितीवर मात करत आश्रमशाळेत शिकून ९३ .२० टक्के गुण मिळवुन वडीलांचं स्वप्न साकार केलं.
श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा खराडेवाडी (जि. सातारा) येथे विकास इयत्ता तिसरीपासून आईवडीलांपासून दुर शिकायला गेला. आई - वडीलांनी पाईपलाईन खोदणे, शेतमजुरी करणे अशी गावात कामे करून चरितार्थ चालवला. दोन वषार्पूर्वी वडीलांचे आकस्मित निधन झाल्यामुळे विकासला धक्का बसला पण यातून सावरत त्याने जिद्दीने अभ्यास करून वडीलांचे स्वप्न साकार केले. आई स्वयंपाकी म्हणून काम करते तर भाऊ मोल मजुरी करतोय. अशा स्थितीत विकास ने आश्रमशाळेत राहून शिक्षण घेऊन दहावीत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
तिसरी ते दहावी आश्रमशाळेत शिकताना सेपाक टकरा, बॉल बॅडमिंटन या खेळात विकास राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा खेळला. खेळाबरोबर अभ्यासातही चमक दाखवताना बोर्ड परीक्षेत त्याने ५०० पैकी ४६६ गुण म्हणजेच ९३ .२० टक्के प्राप्त केल. त्याला विज्ञान शाखेतुन पुढे शिकायचे आहे. सामान्य कुटुंबातील विकासने सर्व सुखसोयी उपलब्ध असलेल्या बड्या घरातील मुलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले आहे.