आश्रमशाळांची गाडी येतेय रुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:33+5:302021-01-01T04:15:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील आश्रमशाळा हळूहळू सुरू होत आहेत. नववी ते ...

Ashram school train is on track! | आश्रमशाळांची गाडी येतेय रुळावर!

आश्रमशाळांची गाडी येतेय रुळावर!

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील आश्रमशाळा हळूहळू सुरू होत आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृहांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने समाजकल्याण विभागाने वसतिगृहे प्रारंभ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत शासनाने पाऊल उचलले असून, २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांतील प्रारंभी कमी असलेली उपस्थिती आता हळूहळू वाढत आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आश्रमशाळा किंवा वसतिगृहात राहतात; परंतु ही वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

जिल्हा परिषद समाजकल्याणचे १०३, तर शासकीय १८ असे एकूण १२१ वसतिगृह जिल्ह्यात असून त्यात ४६१० विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे हे सर्व वसतिगृह बंद होते; परंतु आता हे सुरू करण्याच्या सूचना समाजकल्याणने दिल्या आहेत.

याशिवाय समाजकल्याणच्या ४, खासगी अनुदानित ४३, खासगी विना अनुदानित १३, आदिवासी (शासकीय) २२, आदिवासी (खासगी) २८ अशा एकूण ११० आश्रमशाळा जिल्ह्यात असून, त्यात एकूण १९ हजार ६७९ विद्यार्थी आहेत. यातील १८ शासकीय व २ खासगी अशा २० आश्रमशाळा सध्या सुरू झाल्या असून, त्यात ४०५ विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

-----------------

जिल्ह्यातील आश्रमशाळा - ११०

सुरू झालेल्या आश्रमशाळा - २०

एकूण विद्यार्थी - १९६७९

उपस्थित विद्यार्थी - ४०५

-------------------------

जिल्ह्यातील वसतिगृह - १२१

सुरू झालेले वसतिगृह - ०

एकूण विद्यार्थी - ४६१०

उपस्थित विद्यार्थी - ०

-------------------------

आश्रमशाळांपुढील अडचणी

आश्रमशाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत; मात्र अनेक पालक संमतीपत्र भरून देत नसल्याने उपस्थिती कमी आहे. शिवाय काही ठिकाणी शिक्षकही कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे आश्रमशाळा सुरू करण्यात काहीशा अडचणी येत आहेत.

----------------

वसतिगृहांपुढील अडचणी

शासकीय १८ वसतिगृहांपैकी १० वसतिगृह कोविड सेंटर म्हणून जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेची वसतिगृहे सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागणार आहे.

---------------

आतापर्यंत २० आश्रमशाळा सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. या संमतीपत्राचे प्रमाण कमी आहे. शिवाय काही शिक्षकही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत; परंतु यातूनही मार्ग काढून आश्रमशाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.

- संतोष ठुबे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर.

Web Title: Ashram school train is on track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.