चिल्लर अपहरात आता आशुतोष लांडगे याची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:38+5:302021-03-25T04:20:38+5:30
अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील अपहार प्रकरणात लांडगे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने लांडगे ...
अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील अपहार प्रकरणात लांडगे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने लांडगे याला हस्तांतरित करून घेतले. बुधवारी जिल्हा न्यायाधीश एस.एस. पाटील यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले होते. आरोपी याने बँकेचे पैसे वापरले आहेत. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का आदींबाबत चाैकशी करावयाची असल्याचे सांगत आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली. आरोपीच्या वतीने ॲड. विक्रम वाडेकर यांनी यांनी युक्तिवाद केला की, आशुतोष लांडगे हा बँकेचा कर्जदार आहे. त्याने कर्जापोटीची काही रक्कम बँकेत भरली आहे. तसेच तो काही दिवस पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात होता. त्यामुळे लांडगे याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली.
अर्बन बँकेत एकूण तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे मुख्य शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आशुतोष लांडगे याच्यासह बँकेतील इतर अधिकारी व संचालकांविरोधात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी घनश्याम अच्युत बल्लाळ, प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र विलास हुंडेकरी व स्वप्निल पोपटलाल बोरा यांना अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्यात बँकेच्या इतर संचालकांचाही आर्थिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.