मूल्यमापन पुढील वर्षीही होईल, आता सुरक्षा महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:45+5:302021-04-14T04:18:45+5:30
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी आणि नववी व अकरावी ...
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी आणि नववी व अकरावी या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय योग्य आहे का? मुलांची कोणतीही परीक्षा न घेता, मूल्यमापन न करता त्यांना पुढील वर्गात ढकलणे योग्य आहे का? या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेल्यासारखे होते का? या अनुषंगाने लोकमतने शिक्षणतज्ज्ञ तसेच पालकांची मते जाणून घेतली. त्यावर शिक्षणतज्ज्ञांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. या भयानक काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शासनाने परीक्षा रद्द केल्या हा निर्णय अतिशय योग्य आहे. मुळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्षभर आकारिक मूल्यमापन केलेलेच आहे. केवळ संकलित मूल्यमापन बाकी आहे. हे मूल्यमापन किंवा राहिलेला अभ्यास पुढील वर्गात पुढच्या वर्षी शिक्षक पूर्ण करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे असे काही विशेष नुकसान होणार नाही; परंतु हा काळ सुरक्षेचा आहे. त्यामुळे सर्वांनी सध्या आपली सुरक्षा घेणे, सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञासह पालकांनी व्यक्त केले.
-------------
पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षण हक्क अंतर्गत पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय योग्य आहे; परंतु नववी आणि अकरावीचे मूल्यमापन व्हायला हवे होते. शाळा स्तरावर या वर्गांची बरीचशी तयारी शिक्षकांनी करून घेतलेली आहे.
- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना
-------------
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा शासनाचा निर्णय अतिशय योग्य आहे. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे जे काही नुकसान होणार आहे ते पुढील वर्षी पुढील वर्गात शिक्षक भरून काढू शकतात. त्यासाठी शासनानेच चार महिन्यांचा एखादा ब्रीज कोर्स तयार करून राज्यभर तो राबवावा. त्यातून ही उणीव भरून निघू शकेल.
- भाऊसाहेब चासकर, शिक्षणतज्ज्ञ
-------------
शिक्षकांनी वर्षभर मुलांपर्यंत पोहोचून आकारिक मूल्यमापन केलेले आहे. त्यामुळे परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार नाही हा समज चुकीचा आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यातही तंत्रज्ञानाच्या अनेक अडचणी आहेत. विशेषत: ग्रामीण भागात ही गोष्ट अशक्य वाटते.
-नारायण मंगलारम, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक
----------------------
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे आहे. शासनाने परीक्षा रद्द केल्या ते बरे झाले.
- राजाराम चव्हाण, पालक
-------------
परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय योग्य वाटतो. एखाद्या वर्षी परीक्षा झाली नाही किंवा अभ्यास झाला नाही म्हणून विशेष काही फरक पडत नाही, मात्र या घडीला विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.
- सुनील थोरात, पालक
----------------
वर्ग विद्यार्थीसंख्या
पहिली ६८,७१६
दुसरी ७४,८९६
तिसरी ७८,४५१
चौथी ८०,४४९
पाचवी ७९,६०५
सहावी ७९,७१६
सातवी ७९,७७८
आठवी ८०,०६८
नववी ८१,२००
अकरावी ६३,८२२