ग्रामसुरक्षा यंत्रणेची गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:14+5:302021-04-30T04:26:14+5:30
कर्जत : गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कामकाजात मदत होऊन नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेची ...
कर्जत :
गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कामकाजात मदत होऊन नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेची पोलिसांना मदत होत आहे. सध्या कोरोना मदत कार्यातही या यंत्रणेची मदत होत आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा यंत्रणा कर्जत तालुक्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. लोकहिताचा हेतू व नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी ही यंत्रणा सुरू झाली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव आदींचेही मार्गदर्शन लाभले. ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रात्यक्षिके घेतली. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व नागरिकांना सहभागी करत कार्यशाळा घेतल्या. आता पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यात येत असून नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सुटत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना व माहिती याच ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच फोन कॉलवर नागरिकांपर्यंत तत्काळ पोहाेचत आहेत.
तालुक्यातील कोणत्याही गावात एखादी गुन्हेगारी व अनुचित घटना घडली तर फक्त एका काॅलवर गाव अलर्ट होत आहे. दुर्घटना रोखण्यास मदत होत आहे. गेल्या आठवड्यात चांदे येथे गायरान क्षेत्राला आग लागली होती आणि तेथील प्रतिनिधींच्या एकाच कॉलवर ७० ते ८० ग्रामस्थ काही वेळातच घटनास्थळी जमले व आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कोरोना काळात सध्या पंचायत समिती, नगरपंचायत सक्षमपणे या यंत्रणेचा वापर करत लसीकरण, कोरोना चाचण्या, पाणी, घनकचरा, पाणीपट्टी, घरपट्टी आदींची माहिती नागरिकांना देत आहेत.
---
नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या यंत्रणेत सहभागी व्हायचे आहे. कोणत्याही अडचणीच्या वेळी संपर्कात राहता येईल आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांची माहिती याद्वारे नागरिकांना मिळेल.
-चंद्रशेखर यादव,
पोलीस निरीक्षक, कर्जत