गटविकास अधिका-याकडून टॅँकर ठेकेदाराची पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:47 PM2019-06-21T12:47:57+5:302019-06-21T12:50:18+5:30
संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावाला पाणी पुरवठा करणा-या टॅँकरला गळती लागल्याचे स्टिंग गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
संगमनेर/लोणी : संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावाला पाणी पुरवठा करणा-या टॅँकरला गळती लागल्याचे स्टिंग गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सादतपूरला पाणी पुरवठा करणा-या ठेकेदारावर कारवाई करण्याचे सोडून त्याची पाठराखण केली आहे.
शासकीय टॅँकरला गळती असता कामा नये, तसेच टॅँकर चालकांनी सतत ‘लॉगबुक’ सोबत ठेवावे असा शासनाचा आदेश आहे. मात्र, या आदेशाची पायमल्ली करत बुधवारी एम. एच. १७ बी.डी. ६३९८ या क्रमांकाच्या गळक्या टॅँकरमधून सादतपूरला पाणी पुरवठा होत होता. या टॅँकरचालकाकडे लॉगबुक देखील नव्हते. साधारण वीस दिवसांपूर्वी सादतपूर येथील कामगार तलाठी स्वाती झुरळे यांनी टॅँकर चालक व ठेकेदाराला लॉगबुक संदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी त्यांना लॉगबुक हे सह्यांसाठी ग्रामसेवकाकडे दिल्याचे उत्तर मिळाले होते. याबाबत तलाठी झुरळे यांनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकम यांना कळविले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
कारवाई नाहीच..
गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी दिलेल्या माहितीतून ठेकेदारावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. वेल्ंिडग निघाली, रस्ता खराब अशी अनेक कारणे त्यांनी सांगितली. सादतपूरला गळका टॅँकर पाठविणाऱ्यांवर व संबंधित टॅँकरच्या ठेकेदारावर तसेच टॅँकरचालकाकडे लॉगबुक देखील नाही, अशी अनियमितता असतानही गटविकास अधिकारी शिंदे यांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.