शेतक-यांना दीडपट हमीभावाचे केंद्राचे आश्वासन - अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:45 PM2018-03-31T16:45:22+5:302018-03-31T16:45:43+5:30
राळेगणसिध्दीत अण्णांचे जल्लोषात स्वागत
राळेगणसिद्धी : शेतक-यांना दीड पट हमी भाव देण्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. शेतमालाला हमीभाव मिळाला तर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. पुढील काळात शेतक-यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
नवीदिल्ली येथे रामलिला मैदानावर सात दिवसांच्या उपोषणाच्या सांगतेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शनिवारी (दि.३१) राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी अण्णांनी संत यादवबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना अण्णा हजारे बोलत होते.
राळेगणसिद्धीकडे येताना पुणे विमानतळ, वाघोली, रांजणगाव गणपती, वाडेगव्हाण येथेही नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच रोहिणी गाजरे, माजी सरपंच मंगल मापारी, सीमा औटी, कौशल्या हजारे, शैला भालेकर, रेखा पठारे, रेखा औटी, हिराबाई पोटे, निर्मला आवारी या महिलांनी अण्णांचे औंक्षण केले. हजारे पुढे म्हणाले, रामलीला मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी परिवाराने सात दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून साथ दिली. त्यामुळे मला आंदोलनासाठी मोठी उर्जा मिळाली. एका गावाची ताकद काय असते, हे राळेगणसिद्धीने भारत सरकारला दाखवून दिले. शेतात राबराब राबणा-या शेतक-यांच्या पिकाला मोबदला मिळत नसल्याने आत्महत्या वाढल्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला तर या आत्महत्या थांबतील. दुधालाही चांगला भाव मिळायला हवा, असे ते म्हणाले. हजारे यांनी दिवसभर संत यादवबाबा मंदिरात विश्रांती घेतली. सायंकाळी ग्रामसभेत विजयोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे उपसरपंच लाभेष औटी यांनी सांगीतले. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, आदर्श पतसंस्थेचे संचालक रमेश औटी, विलास औटी, गणपत पठारे, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, दत्ता आवारी, दादाभाऊ गाजरे, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, सुभाष पठारे, अरुण भालेकर, महेंद्र गायकवाड, नाना लंके, गणेश आवारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.