दहावीच्या परीक्षा केंद्रावर टुकार पोरांचा धुडगूस, हातात काठी घेऊन महिला शिक्षिकेला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:54 PM2024-03-27T16:54:59+5:302024-03-27T16:55:30+5:30
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि.२६) भूगोलाच्या पेपरच्या दिवशी हा गंभीर प्रकार घडला.
बोधेगाव (जि. अहमदनगर) : चल माझा फोटो काढ, बडबड नको करूस, तुला एका रपक्यात खाली बसवीन, असा एकेरी उल्लेख करत दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान आलेल्या टुकार पोरांनी महिला पर्यवेक्षिकाला दमबाजी केली. तसेच हातात काठ्या घेऊन दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी खुलेआम परीक्षा हॉलमध्ये धुडगूस घातला. विशेष म्हणजे या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि.२६) भूगोलाच्या पेपरच्या दिवशी हा गंभीर प्रकार घडला.
बोधेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे दहावीचे मुख्य परीक्षा केंद्र तर बालमटाकळी येथील भगवान विद्यालयात उपकेंद्र आहे. मंगळवारी परीक्षा सुरू असताना जवळपास १० ते १५ युवक खुलेआम परीक्षा हाॅलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना काॅपी पुरवत होते. तर काही युवक हातात काठी घेऊन धुडगूस घालत होते. परीक्षा केंद्रावरील एक महिला शिक्षिकेने संबंधित युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला तसेच मोबाइलमध्ये त्यांनी व्हिडीओही काढला. यावेळी धुडगूस घालणाऱ्या युवकांनी सदर शिक्षिकेला दमबाजी केली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात व्यत्यय आला. येथील काही पुरुष शिक्षक महिला शिक्षिकेच्या मदतीला धावून न येता केवळ दुरून गंमत पाहत असल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी संबंधित केंद्र संचालकांकडून धुडगूस घालणाऱ्या युवकांविरोधात पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नव्हती.
परीक्षा केंद्रावरील आलेल्या युवकांचे व्हिडीओ मी पाहिले. येथील परीक्षा केंद्रावर पोलिस संरक्षण नसल्याने असा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस संरक्षणासाठी पत्र दिले होते. मात्र एकच दिवस पोलिस आले. संबंधित महिला शिक्षिकेला व्हिडीओबाबत विचारून पुढील कारवाईविषयी माहिती देतो.
- उत्तम रक्टे, सहायक केंद्र संचालक, भगवान विद्यालय बालमटाकळी
महिला सुरक्षेबाबत उदासीनता
दरम्यान, या घटनेबाबत शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली असता परीक्षा केंद्र संचालक यांनी आमच्याकडे पोलिस संरक्षण मागितले असल्याबाबतचे पत्र बघतो, असे म्हणत याविषयी अधिक बोलणे टाळले. तर परीक्षा केंद्र संचालक तथा संबंधित संस्थेने महिला शिक्षिकेला दमबाजी केल्याची साधी तक्रारसुद्धा नोंदवली नसल्याने महिला सुरक्षेसंबंधी संबंधित केंद्रसंचालक व पोलिस प्रशासनाची उदासीनता दिसून येते.