श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परप्रांतीय तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:19 PM2018-01-12T12:19:40+5:302018-01-12T12:21:25+5:30
श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीस श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली.
श्रीरामपूर : शहरातील मोरगे वस्ती भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीस श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली.
बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भैया ऊर्फ सोनू शर्मा (मोरगेवस्ती, प्रभाग ७) याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किराणा दुकानात दुधाची पिशवी आणण्यासाठी ही मुलगी घराबाहेर पडली असता आरोपीने तिला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक वाकचौरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. फौजदार श्रीराम शिंदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी हा उत्तर प्रदेश येथील आहे. त्याची पार्श्वभूमी शहर पोलीस तपासत आहेत. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवार १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुलीचे वैद्यकीय अहवाल अजून प्राप्त झाले नसल्याची माहिती तपासाधिकारी फौजदार श्रीराम शिंदे यांनी दिली.