नववर्ष स्वागतासाठी आलेल्या पदयात्रीच्या पालखीवर हल्ला, लुटमारीचा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 08:39 AM2019-01-01T08:39:17+5:302019-01-01T08:53:41+5:30
नववर्ष स्वागतासाठी औरंगाबादवरून आलेल्या 200 पदयात्रीना काल रात्री साई मंदिराकडे जात असताना दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिर्डी - नववर्ष स्वागतासाठी औरंगाबादवरून आलेल्या 200 पदयात्रीना काल रात्री साई मंदिराकडे जात असताना दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.
साई मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या साई आश्रम दोन मध्ये हे भाविक उतरले होते. रात्री दहा वाजता ते नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिराकडे निघाले होते. त्यावेळी शासकीय विश्राम पाठीमागे रस्त्यावर या पालखीवर पाच ते सहा तरुणांनी दगडफेक करून पालखीतील महिलांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. यात एका भाविकाच्या डोक्याला दुखापत झाली असून काहींना किरकोळ इजा झाल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पालखीतील भाविकांच्या प्रतिकारामुळे हल्लेखोर पसार झाले. याबाबत भाविकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एकाला पहाटे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसराची नाकाबंदी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे अधिक तपास करत आहेत.