मोकाट कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:40 PM2019-07-03T12:40:22+5:302019-07-03T12:41:23+5:30
शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे़ मोकाट कुत्र्याने येथील नंदनवन वसाहतीतील अवधूत श्रीकांत गायकवाड (वय ४) या चिमुकल्यावर हल्ला केला असून,
अहमदनगर : शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे़ मोकाट कुत्र्याने येथील नंदनवन वसाहतीतील अवधूत श्रीकांत गायकवाड (वय ४) या चिमुकल्यावर हल्ला केला असून, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पवननगर भागातील दुर्गा पिंपळे (वय १२), या मुलीला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली़ या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़
बोल्हेगाव येथील मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सावेडी उपनगरांत एकाच दिवशी कुत्र्याने दोन मुलांवर हल्ला केला़ महापालिका आयुक्त वास्तव्यास असलेल्या नंदनवन वसाहतीतील मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षांचा अवधूत गंभीर जखमी झाला़ त्याला उपचारासाठी तातडीने येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जखमी अवधूतवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सावेडी उपनगरातील पवननगर येथे पाळीव कुत्र्याने दुर्गा पिंपळे,या बारा वर्षीय मुलीवर हल्ला केला़ या हल्ल्यात दुर्गा गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चर्चा केली़ या भागातील माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर व उद्योजक शिवाजी चव्हाण यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली़ यावेळी जखमीच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ यापूर्वी सावेडी उपनगरांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून, या हल्ल्यात अनेकजण जखमी
झालेले आहेत़ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न उपस्थित केला होता़
प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही़ त्यामुळेच कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र शहरात सुरूच असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़.