गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला

By सुदाम देशमुख | Published: April 3, 2023 11:29 AM2023-04-03T11:29:58+5:302023-04-03T11:30:16+5:30

डोक्यात पाटा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Attack on clerk along with Nayab Tehsildar of Shevgaon who went for minor mineral operations | गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला

गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर: अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना, हसनापुर ( ता. शेवगाव ) शिवारात रविवारी रात्री घडली आहे. 

या घटनेत परिविक्षाधीन नायब तहसीलदार व कारकून असे पथकातील दोघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून उर्वरित तीन आरोपी फरार झाले आहेत. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार राहुल पोपट गुरव यांनी फिर्याद दिली असून विठ्ठल लक्ष्मण ढाकणे, अंगद अर्जुन ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे, अर्जुन विष्णू ढाकणे या चौघांच्या विरोधात, जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मी व अव्वल कारकून रवींद्र सानप, तलाठी सचिन सुरेश लोहकरे, सोमनाथ प्रकाश आमने, हे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेले होते. यावेळी  गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला. त्यास थांबविले असता ट्रॅक्टर वरील चालक तेथून पळून गेला. त्यानंतर तिथे बुलेट ( क्र. एमएच १७ बिके ८६१८) या गाडीवर अर्जुन विष्णू ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे हे दोघे तिथे आले. यावेळी त्यांनी उर्मट भाषेत तुम्ही कोण असे विचारले असता आम्ही आमचा परिचय दिला.

यावेळी त्यांनी तुमच्या सारखे पुष्कळ अधिकारी बघितले आहेत. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही तहसील कार्यालयात ट्रॅक्टर नेणार नाहीत. त्याच वेळी विठ्ठल ढाकणे, अंगद ढाकणे हे मोटर सायकल वरुन काठ्या व लोखंडी गज घेऊन तिथे आले. आम्हाला शिवीगाळ करु लागले. यावेळी विठ्ठल ढाकणे ट्रॅक्टर वर बसून ट्रॅक्टर पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही त्यास अडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग येऊन आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. आता यांना जिवंत मारुन टाकतो असे म्हणत विठ्ठल ढाकणे याने दगडी पाटा जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फेकून मारला असता यावेळी माझे सहकारी सचिन लोहकरे यांनी बाजूला ओढल्याने तो माझ्या डाव्या हाताला लागल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अर्जुन ढाकणे यास शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर उर्वरित फरार झाले आहे.

Web Title: Attack on clerk along with Nayab Tehsildar of Shevgaon who went for minor mineral operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.